Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांच्या ताफ्यात १२ नव्या ‘बोलेरो निओ’. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव : जिल्ह्यातील पोलिसांचे दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी १२ नव्या महिंद्रा बोलेरो निओ चारचाकी वाहनांचा पोलीस दलात समावेश करण्यात आला आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या वाहनांमुळे पोलीस ठाण्यांची नियमित गस्त, बंदोबस्त तसेच आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी तातडीने पोहोचण्यास मदत होणार आहे.

सन २०२६-२७ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागासाठी १४ नवीन चारचाकी वाहनांना १ कोटी ४४ लाख २९ हजार २७८ रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी जळगाव पोलीस विभागासाठी १०, तर चाळीसगाव आणि भुसावळ लोहमार्ग पोलिसांसाठी प्रत्येकी एक अशा १२ वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. या वाहनांच्या प्रत्यक्ष खरेदीसाठी १ कोटी १६ लाख १६ हजार रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित दोन वाहने बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच श्वान पथकासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

गस्त आणि आपत्कालीन प्रतिसादाला चालना

नव्या वाहनांमुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात पेट्रोलिंग अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. तसेच बंदोबस्ताच्या ठिकाणी पोहचणे आणि आपत्कालीन प्रसंगी घटनास्थळी तातडीने दाखल होण्याची पोलीस यंत्रणेची क्षमता वाढणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलावर बंदोबस्ताची जबाबदारी वाढली असताना नव्या वाहनांचा उपयोग महत्त्वाचा ठरणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून गेल्या चार ते पाच वर्षांत पोलीस विभागाच्या वाहन व्यवस्थेच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला. या कालावधीत ११३ चारचाकी आणि १८८ दुचाकी अशी एकूण ३०१ वाहने पोलीस विभागाला उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी ११ कोटी ५२ लाख ३१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस ठाणे आणि विविध शाखांच्या क्षेत्रीय कामकाजासाठी वाहनांची उपलब्धता वाढली आहे.

पालकमंत्री काय म्हणाले?

लोकार्पणप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सक्षम मनुष्यबळासोबतच पुरेशी वाहने आणि आधुनिक साधनसामुग्री आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून पोलीस विभागाच्या गरजांना प्राधान्य देत निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. गणेशोत्सव व अन्य सण-उत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत असून, त्यांच्या कामकाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

भौगोलिक विस्तारामुळे वाहनांची गरज

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जळगाव जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार आणि पोलीस ठाण्यांचे मोठे कार्यक्षेत्र लक्षात घेता वाहनांची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. नव्या वाहनांमुळे पेट्रोलिंग, बंदोबस्त आणि तातडीच्या घटनांना प्रतिसाद देण्याची क्षमता वाढेल. विशेषतः सण-उत्सवाच्या काळात ही वाहने पोलीस यंत्रणेसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, रेल्वे पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार, एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड, मोटार परिवहन विभागाचे अधिकारी प्रवीण तायडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *