Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

सुधींद्र कुलकर्णींचं आयआयटी आत्महत्या प्रकरणी भाष्य; “अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत सूर्यनारायण डुल्लांवर कारवाई करणं अयोग्य”

आयआयटी मुंबई’च्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी साहिल वाकोडेने (वय २२) आत्महत्या केल्यानंतर शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले आहे.

या घटनेनंतर आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यामुळे प्रशासनाने एफआयआरमध्ये नाव असलेल्या प्राध्यापकावर कारवाई केल्याची माहिती दिली. साहिल वाकोडेच्या आत्महत्येनंतर आयआयटी कॅम्पसमध्ये जातीयवाद होत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यातच प्राध्यापकांविरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे परस्परविरोधी दावे करण्यात आले. याबाबत ज्येष्ठ विचारवंत सुधींद्र कुलकर्णी यांनी त्यांचं परखड आणि स्पष्ट मत मांडलं आहे.

आयआयटी प्रकरणाबाबत सुधींद्र कुलकर्णी काय म्हणाले?

“साहिलची आत्महत्या ही अत्यंत दुःखद घटना आहे. मी साहिलच्या आई वडिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. कुठल्याही जातीचा, धर्माचा विद्यार्थी असो त्याची आत्महत्या ही दुःखदायकच असते. मला या घटनेचं आणखी जास्त दुःख आहे कारण मी आयआयटी बॉम्बेचा एक माजी विद्यार्थी आहे. ही घटना का घडली? विद्यार्थ्याने आत्महत्या का केली? हे समजून घेण्याचा अधिकार मुलाच्या आई वडिलांना आहे. कारण त्यांनी त्यांचा मुलगा गमावला आहे. त्यामुळे या घटनेची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे आणि जे कुणी दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. असं असलं तरीही मी माझ्या पत्रात एक मुद्दा आणखी मांडला आहे. कुठलाही पुरावा नसताना, तपास नसताना प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करणं योग्य नाही. कारण यामुळे त्यांच्यामध्ये इतर प्राध्यापकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण साहिल हा विद्यार्थी चॅटजीपीटीचा वापर परीक्षेत करत होता. त्याला पकडण्यात आलं होतं ही बाब समोर आली आहे. आणखी काही समोर आलं आणि प्राध्यापक डुल्ला यांची चूक असेल तर त्यांना शिक्षा व्हायला हवी. पण काहीही नसताना त्यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली जाणं योग्य नाही. अशा पद्धतीने कारवाई होणं हा रिव्हर्स कास्टिझम आहे.” असं सुधींद्र कुलकर्णींनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अॅट्रसिटी कायद्याचा गैरवापर केला जातो याची उदाहरणं आपण पाहिली आहेत-सुधींद्र कुलकर्णी

पुढे सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, “भारतातल्या अनेक राज्यांमध्ये अॅट्रॉसिटीचा गैरवापर केला जातो याची उदाहरणं आपण पाहिली आहेत. कुणाला तरी फसवण्यासाठी, धमकवण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. तसंच या प्रकरणांमध्ये कनव्हिक्शन रेट फार कमी आहे. केस झाल्यानंतर अनेकदा लोक निर्दोषही सुटतात. कोर्ट कचेरीचा त्रास त्यांना होतो. आता डुल्ला यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक अवॉर्ड्स मिळाले आहेत. कर्तव्य बजावलं म्हणून जर शिक्षा होत असेल किंवा तुरुंगात धाडलं जात असेल तर ते गैर आहे. राजकीय पक्ष मग सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्ष असोत ते यावर बोलणार नाहीत. आज समाजात, विद्यार्थ्यांमध्ये इतर घटकांमध्ये अॅट्रॉसिटी अॅक्ट बाबत चर्चा झाली पाहिजे. जातीयता, उच्च-नीच या गोष्टी अजूनही समाजात आहेत. त्यांचं निर्मूलन करण्यासाठी सामाजिक मोहीम चालवली पाहिजे. ती मोहीम कॉलेज कॅम्पसपर्यंत, प्रत्येक बॅचमध्ये, प्रत्येक क्लासरूममध्ये पोहचली पाहिजे. जातीद्वेष, धर्मद्वेष याला कुठेही थारा असता कामा नये.” असंही सुधींद्र कुलकर्णींनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *