Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणातील CBI तपासावर सुशांतचा भाऊ स्पष्टच बोलला..

दिशा सालियान प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळं वळण मिळालं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दिशा सालियन प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू केली आहे. या घडामोडीनंतर सुशांतच्या कुटुंबीयांकडूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत.

सुशांतचा चुलत भाऊ पन्ना सिंह यांनी या निर्णयाचं स्वागत करत, ‘आता तरी आम्हाला न्याय मिळेल’, अशी आशा व्यक्त केली आहे. दिशा सालियन ही सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर होती. दिशा सालियान आणि सुशांत सिंह या दोघांच्या घटनांमध्ये काही संबंध आहे का, याबाबत गेल्या काही वर्षांपासून विविध दावे आणि चर्चा होत आहेत.

आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर CBI ने दिशा सालियन प्रकरणात FIR दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. या तपासामध्ये आधी झालेल्या चौकशीतील कागदपत्रे, पोलिसांचे रेकॉर्ड, फॉरेन्सिक आणि पोस्टमॉर्टेमशी संबंधित माहिती तसंच घटनास्थळाशी निगडित बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय त्या रात्री दिशा ज्या ठिकाणी होती, तिथे उपस्थित असलेल्या काही व्यक्तींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

सुशांतचा चुलत भाऊ पन्ना सिंह यांनी बिहारमधील पूर्णिया इथं या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं सांगितलं. नव्या तपासामुळे सत्य समोर येईल आणि कुटुंबाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी सुशांत प्रकरणाबाबत गंभीर दावेही केले आहेत. सुशांतचा चुलत भाऊ आणि माजी बिहार मंत्री नीरज कुमार सिंह बबलू यांनीही या तपासामुळे आशा निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. सुशांतच्या कुटुंबीयांसह त्याचे चाहतेही या नव्या तपासाकडे लक्ष ठेवून आहेत. सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ती हिनेही सोशल मीडिया पोस्टद्वारे नव्या चौकशीचं स्वागत करत सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान, CBI च्या एफआयआरमध्ये विविध आरोपांचा तपास करण्याची तरतूद आहे. CBI नेही तपासादरम्यान पुरावे मिळाल्याशिवाय कोणालाही आरोपी म्हणून घोषित करू नये, असा उच्च न्यायालयाचा निर्देश आहे. त्यामुळे आता CBIच्या तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते, जुन्या तपासातील प्रश्नांची उत्तरं मिळतात का आणि दिशा सालियनच्या प्रकरणाचं गूढ उकलतं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *