Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

पुरंदरच्या सीताफळाला विक्रमी भाव; सासवड बाजारात क्रेटला तब्बल ३,६०० रुपये

सासवड: पुरंदर तालुक्याची ओळख असलेल्या सीताफळाच्या हंगामाला सध्या चांगलीच रंगत आली आहे. दर्जेदार उत्पादनाला बाजारात विक्रमी मागणी मिळत आहे. सासवड बाजारात एका क्रेटला तब्बल ३ हजार ६०० रुपये दर मिळाला आहे.

‍सासवड बाजारपेठेत रविवारी (दि. २०) सीताफळाची सुमारे एक हजार कॅरेट आवक झाली. यामध्ये राजेवाडी येथील श्रीरंग कोंडिबा कडलग व संदीप श्रीरंग कडलग यांच्या सीताफळाने विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांच्या सीताफळाला प्रतिकॅरेटने तब्बल ३ हजार ६०० रुपयांचा भाव मिळविला. खरेदी व्यापारी प्रणव काळे यांनी केली. हा यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचा सर्वोच्च भाव ठरला आहे. कडलग यांच्या सीताफळाचा आकार, रंग, गर आणि चव यामुळे सासवड बाजारात व्यापारी व शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली. त्यांच्या बागेतील काही मोठ्या आकाराच्या फळांना प्रतिफळ सुमारे १०० रुपयांपर्यंतचा दर मिळाला. एका दिवसात कडलग यांच्या ७२ कॅरेट सीताफळांची सुमारे २ लाख १५ हजार रुपयांची विक्री झाली.

कडलग यांच्या बागेतील काही सीताफळ तब्बल एक किलो वजनापर्यंत असल्याने त्यांची बाजारात विशेष चर्चा झाली. सर्व फळे आकाराने जवळपास एकसारखी असून, आकर्षक रंग व दर्जेदार गर हे या उत्पादनाचे वैशिष्ट्य ठरले. दर्जेदार सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही समाधानाची बाब ठरली आहे. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेताना मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर केल्यामुळे फळांचा दर्जा चांगला मिळाल्याचे शेतकरी संदीप कडलग यांनी सांगितले.

माझ्या २ हजार ४०० झाडांचे उत्पादन पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने घेतले जाते. त्यामुळे फळांचा आकार व रंग आकर्षक आला असून, सासवड बाजारात मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे समाधान असल्याचेही त्यांनी नमूद केले. सासवड बाजारातून सीताफळ खरेदी करून विविध राज्यांमध्ये पाठविणारे प्रणव काळे, नितीन काळे, गिरीश काळे, गौरव काळे, तुषार झेंडे, शंकर झेंडे, विशाल तळेकर, सुशील झेंडे, विठ्ठल काळे, सागर धुमाळ, गणेश काळे, किशोर काळे व योगेश भिंताडे या व्यापाऱ्यांनी यंदा परराज्यांतून मागणी वाढल्याचे सांगितले.

दिल्ली-गुवाहाटीपर्यंत सीताफळाची मागणी

सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्रावर सीताफळाच्या बागा आहेत. येथील सीताफळाला पुणे जिल्ह्यासह दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, जयपूर, गोवा, हैदराबाद आणि बंगळुरू या बाजारपेठांमध्ये मागणी आहे. स्थानिक व्यापाऱ्यांसोबतच परराज्यांतील व्यापारीही सीताफळ खरेदीसाठी सासवड बाजारपेठेत दाखल होत आहेत.

‘फुले पुरंदर’ जातीला पसंती

बाजारात सीताफळाच्या विविध जाती उपलब्ध असल्या तरी ‘फुले पुरंदर’ जातीला भरपूर गर, आकर्षक आकार आणि अप्रतिम चवीमुळे विशेष मागणी मिळत आहे. दर्जेदार उत्पादन, मोठा आकार आणि चांगली चव यामुळे या जातीच्या सीताफळाला व्यापाऱ्यांकडून पसंती मिळत असल्याचे चित्र सासवड बाजारात पाहायला मिळत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *