
पुणे : क्लाऊडचा स्वीकार, कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि व्यवसायांचे वेगाने होणारे डिजिटायझेशन यामुळे देशातील डेटा सेंटर म्हणजेच विदा केंद्र क्षमतेत मोठी वाढ होत आहे.
कंपन्यांकडून विदा केंद्रासाठी मुंबई आणि पुण्याला पसंती दिली जात आहे. या वर्षी पहिल्या सहामाहीत या दोन्ही महानगरांतील विदा केंद्र क्षमता अनुक्रमे ८९० मेगावॉट आणि १३३ मेगावॉटवर पोहोचली आहे. त्यात २०३० पर्यंत दुपटीहून अधिक वाढ होण्याचा अंदाज आहे.
देशातील विदा केंद्रांचा जानेवारी ते जून या सहामाहीचा अहवाल ‘कुशमॅन अँड वेकफिल्ड’ संस्थेने जाहीर केला आहे. या अहवालानुसार, देशात सध्या एकूण १४७ विदा केंद्रे असून, ती चालविणाऱ्या ३३ सेवा पुरवठादार कंपन्या आहेत. देशातील एकूण विदा केंद्र क्षमता पहिल्या सहामाहीत १ हजार ७८९ मेगावॉटवर पोहोचली आहे. या सहामाहीत एकूण १७८ मेगावॉट क्षमतेची भर पडली आहे. देशात २०३० पर्यंत आणखी ३ हजार ८६० मेगावॉट क्षमतेच्या विदा केंद्रांचा पुरवठा होणार आहे. त्यातील ५०९ मेगावॉट क्षमतेच्या विदा केंद्रांची उभारणी सुरू असून, ३ हजार ३५१ मेगावॉट क्षमतेची विदा केंद्रे नियोजनाच्या टप्प्यावर आहेत.
देशात सर्वाधिक विदा केंद्र क्षमता मुंबईत आहे. मुंबईत सध्या कार्यान्वित विदा केंद्र क्षमता ८९० मेगावॉट आहे. आगामी काळात त्यात आणखी १ हजार ७२६ मेगावॉटची भर पडणार आहे. भक्कम डिजिटल पायाभूत सुविधा, ऊर्जेची उपलब्धता आणि दळणवळणाच्या व्यापक सुविधा यामुळे कंपन्यांकडून मुंबईला पसंती मिळत आहे. पुण्याचा विचार करता पहिल्या सहामाहीत विदा केंद्र क्षमता १३३ मेगावॉटवर पोहोचली आहे. याच वेळी २५८ मेगावॉट क्षमतेच्या नवीन विदा केंद्रांचा पुरवठा होणार आहे. जागतिक पातळीवरील कंपन्यांचा झालेला व्यवसाय विस्तार आणि इतर महानगरांच्या तुलनेत कमी किमतीत उपलब्ध असलेली जागा यामुळे कंपन्यांचा पुण्याकडे कल वाढत आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
क्लाऊडच्या स्वीकारासाठी आवश्यक
देशातील विदा केंद्र परिसंस्था अतिशय वेगाने विस्तारत आहे. विविध कंपन्या या क्षेत्रात कार्यरत असून, देशातील सर्वच महानगरांमध्ये विदा केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. क्लाऊडच्या स्वीकारातील पुढील टप्प्यावर विदा केंद्र परिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याच वेळी अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी एआयचा वापर आणि विदा आधारित विकास या गोष्टी महत्त्वाच्या असून, त्यातही ही परिसंस्था कळीची भूमिका बजावेल, अशी माहिती कुशमॅन अँड वेकफिल्डचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक गौतम सराफ यांनी दिली.



