खासदार संजय जाधवांकडून डॅमेज कंट्रोल, मनोज जरांगे पाटलांची घेतली भेट, म्हणाले, ‘मराठा समाजाच्या न्याय्य …’

अंतरवाली सराटीत आंदोलन सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांनी खासदार संजय जाधव यांना फोन केला होता. जाधव यांनी आयोजित केलेला कार्यक्रम रद्द करण्यास त्यांनी सांगितले होते.
मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित होत असलेला हा कार्यक्रम रद्द न करण्याची भूमिका जाधव यांनी घेतली होती.
जरांगे पाटील यांनी जाधव आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर त्यावेळी जोरदार टीका केली होती. जाधव हे मराठ्यांच्या मतांवर निवडून येतात, असे इशारा देखील त्यांनी दिला होता. दरम्यान, आता जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी खासदार संजय जाधव यांनी रुग्णालयात जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि काळजी घेण्याचा आग्रह केला. तसेच मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी अविरत संघर्ष करणाऱ्या मनोजदादांना आई तुळजाभवानी मातेच्या कृपेने लवकर पूर्ण आरोग्य लाभावे, असे म्हटले.



