
अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील जालना -बिड महामार्गावरील बसस्थानक परिसरातील चार दुकानाला सोमवारी (ता.21) पहाटे दोन ते अडीच वाजता आग लागली असल्याचे समजते. हि आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.मात्र आगीत दुकानातील साहित्य जळून अक्षरशः कोळसा झाला आहे.
यामध्ये 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आग लागलेल्या दुकानामध्ये व्यासायिक प्रल्हाद उगले याचे शिवकृपा जनरल स्टोअर्स, गोपाल बाहेती यांचे व्दारका प्रोहिजन्स, शेख जलील यांचे किसान इलेक्ट्रिकल व एका सलून चा समावेश आहे. आग लागल्याचे समजताच व्यासायिक, नागरिक, मित्रमंडळी,नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती.
नगर पालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी उशिरा पोहचली: अंबड नगर पालिकेची अग्निशमन दलांची गाडी आग लागलेल्या ठिकाणी उशिराने पोहचली होती. गाडीत आग विझविण्यासाठी पाणी नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे.यामुळे सकाळी सात वाजेपर्यंत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. यामुळे व्यावसायिकासह नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दुकानातील साहित्य जळून कोळसा आगीत 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान:
बसस्थानक परिसरात जालना -बिड महामार्गावर माझे शिवकृपा जनरल स्टोअर्स असून शाळा, महाविद्यालय सुरू झाल्याने शैक्षणिक साहित्य, झेरॉक्स मशीन, संगणक व ऐन सणासुदीचे दिवस सुरू असल्याने नेमकेच पाच ते सात लाख रुपयांची खरेदी करून हाताला चार पैसे मिळण्याची आशा मनाशी बाळगली होती. मात्र सर्व काही हातचे गेले. शिल्लक काहीच राहिले नाही.
अंबड शहरात दुकानाला आग लागल्याची हि दुसरी घटना घडली आहे. दुकानाला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागते की कोणीतरी अज्ञात व्यक्ती खोडसाळपणाने आग लावून नुकसान करतात. याचा अद्यापही शोध लागलेला नाही. यामुळे व्यासायिक व नागरिक यांच्यातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. आगीत दुकान जळून सर्वच हातचे गेल्याने शिवकृपा जनरल स्टोअर्स चे चालक प्रल्हाद उगले यांच्या डोळ्यातून खळखळ अश्रू वाहत असल्याने त्यांची पुरती हतबलता वाढली होती.



