
मुंबई : दीपिका पदुकोणने शुक्रवारी (18 सप्टेंबर) सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली होती. तिच्यासोबत तिचे पती रणवीर सिंग आणि सासरचे लोक होते. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसातच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी आनंदाचे आगमन झाले आहे.
दीपिका पदुकोणने आज (19 सप्टेंबर) दुसऱ्या मुलीला जन्म दिला आहे. दीपिकाने स्वतः एका पोस्टद्वारे ही आनंदाही बातमी शेअर केली आहे.
दीपिका पदुकोण यापूर्वी 8 सप्टेंबर 2024 रोजी आई झाली होती, तेव्हा तिने ‘दुआ’ नावाच्या मुलीला जन्म दिला होता. रणवीर आणि दीपिकाने दिवाळी 2025 मध्ये त्यांच्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला होता. यानंतर दीपिका पदुकोणने 19 एप्रिल रोजी तिच्या दुसऱ्या गर्भधारणेची घोषणा केली होती. तिने चिमुकली ‘दुआ’ हिच्या हातात प्रेग्नन्सी टेस्ट किट असलेला फोटो शेअर केला होता. त्या पोस्टमध्ये तिने ‘नजर न लागो’ दर्शवणारे इमोजीही वापरले होते. यानंतर आता दीपिका दुसऱ्यांदा आई झाली असून तिने एका पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. दीपिकाच्या पोस्टमध्ये तिच्या मुलीच्या पावलांचे ठसे दिसत आहेत. तसेच त्यावर “स्वागत आहे, चिमुकली… 19/09/2026,” असे लिहिले आहे.
चाहत्यांसह कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव
मुलीला जन्म दिल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि कलाकार दीपिकाच्या पोस्टवर अभिनंदन व्यक्त करत आहेत. श्रेया घोषाल, कृती खरबंदा, धनश्री आणि सारा अर्जुन यांसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट्स विभागात शुभेच्छा दिल्या आहेत. राधा अष्टमीच्या शुभ दिवशी दीपिका पदुकोणच्या घरी मुलीचा जन्म झाल्यामुळे अनेक युजर्सही आनंदी आहेत. युजर्सनी ‘हार्ट इमोजी’ वापरून या जोडप्याचे अभिनंदन केले.



