केतन अग्रवालला लोहगडावरून धक्का नेमका कुणी दिला? सिया की चेतन? पोलीसांच्या 5053 पानांच्या चार्टशीटमधून अखेर मोठा खुलासा!

पुणेच नाही तर देशाला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल हत्याकांडात आता नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अनेक धक्कादायक बाबी आढळून आल्या आहेत. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल, तिचा मित्र चेतन चौधरी आणि रितेश हांगे या तिघांविरोधात पोलिसांनी तब्बल 5053 पानांचे दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आता तपासात मोठे खुलासे झाले आहेत. अशातच केतनला लोहगडावरून नेमका धक्का कुणी दिला? या प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलंय.
नेमका धक्का कुणी दिला?
दोषारोपपत्रातून हत्येपूर्वीची रेकी, बनावट सोशल मीडिया अकाउंट, केतनला लोहगडावर आणण्यासाठी आखलेला कट आणि हत्येपूर्वी करण्यात आलेली तयारी याचा खुलासा झाला आहे. पोलिसांच्या चौकशीत सिया गोयलने चेतन चौधरीवर धक्का देण्याचा आरोप केला होता. तर चेतन चौधरीने सिया गोयलवर धक्का दिल्याचा आरोप केला होता. त्यामुळे नेमका धक्का कुणी दिला? यावर आता मोठा खुलासा पोलिसांच्या चार्टशीटमधून झाला आहे.
सियाने केतनच्या पायावर लाथ मारली अन्…
18 जून रोजी सिया गोयलने घटनास्थळी पोहोचल्यावर आपला डाव आखला. ती बुटाची लेस बांधण्यासाठी खाली बसली अन् चेतनला उशारा केला. सगळं काही आधीच ठरल्याप्रमाणे सियाने केतनच्या पायावर लाथ मारली अन् त्याला अस्थिर केलं. त्यानंतर त्याचे पाय हवेत राहतील, असा प्लॅन होता अन् तसंच झालं. मृत्यूच्या शेवटच्या क्षणी चेतनने तात्काळ केतनचा पाय हवेत असल्याचं पाहून त्याला दरीच्या दिशेने ढकललं अन् त्याचा गेम केला.
एकूण 5053 पानांचे दोषारोपपत्र
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. याशिवाय आरोपींच्या हालचाली, रेकी, सोशल मीडिया अकाउंट, हत्येपूर्वीचे नियोजन आणि कटाशी संबंधित इतर बाबींचा तपशील दोषारोपपत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एकूण 5053 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.



