Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

प्रत्येकाला लॅपटॉप खरेदी करता येईल एवढा जगात काळा पैसा! सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणतात.

जगात एवढे प्रचंड मनी लॉण्डरिंग होते की त्या काळ्या पैशातून जगाच्या आठ अब्ज लोकसंख्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक लॅपटॉप घेऊनदेखील काही पैसे शिल्लक राहतील, असे वक्तव्य सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केले.

लंडन येथे आयोजित ‘इंटरनॅशनल सिम्पोजियम ऑन इकॉनॉमिक क्राईम’ या परिसंवादाच्या समारोपावेळी ते बोलत होते.

वाढते मनी लॉण्डरिंग आणि डिजिटल अरेस्ट यासारख्या प्रकरणांवरून सरन्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, मनी लॉण्डरिंगच्या प्रत्येक 100 रुपयांमागे अधिकारी केवळ 1 रुपयाच वसूल करू शकतात. मात्र, काळय़ा पैशांच्या या अथांग सागरातून एकापेक्षाही कमी हिस्सा कधी तरी वसूल केला जातो. जगभरातील मनी लॉण्डरिंगचे अंदाज खरे मानल्यास जगात एका वर्षात एवढा प्रचंड काळा पैसा निर्माण होतो की, त्या पैशातून जगातील सर्व आठ अब्ज लोकांसाठी एक लॅपटॉप खरेदी करूनदेखील काही पैसे शिल्लक राहतील. विविध देशांसोबत सहकार्य करार केले जातात. त्यांची यंत्रणा अपूर्ण असली तरीही बेकायदेशीरपणे कमावलेली संपत्ती जिथून चोरली जाते, तिथे ती संपत्ती क्वचितच थांबते, हे हिंदुस्थाननेदेखील शिकले आहे, असे सूर्य कांत म्हणाले.

‘डिजिटल अरेस्ट’चा धोका

डिजिटल अरेस्टचा धोका कसा वाढतो, याची माहिती देत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सांगितले की, अशा प्रकरणांचे प्रमाण वाढले आहे. फसवणूक करणारे लोक व्हिडीओ कॉलवर पोलीस अधिकारी, न्यायालयीन अधिकारी किंवा नोकरशहा असल्याचे भासवून नागरिकांची कष्टाची कमाई लुटतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने संसदेकडून कायदा बनविण्याची वाट न पाहता केंद्र आणि राज्यांना पावले उचलण्याच्या सूचना केल्या आहेत, असे न्या. सूर्य कांत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *