धर्माचा अपमान करण्याची परवानगी देता येणार नाही; नास्तिक म्हणून मत मांडण्याचा अधिकार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

हिंदुस्थानचे संविधान ईश्वराचे अस्तित्व नाकारणाऱ्या नास्तिकाला किंवा धर्म न मानणाऱ्या व्यक्तीलाही स्वतःचे मत बाळगण्याची मुभा देते. या मतामुळे इतरांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असे मानले जात नाही.
मात्र या अधिकाराने कोणत्याही धर्माचा अपमान करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण उच्च न्यायालयाने दिला आहे.
आपली राज्यघटना धार्मिक स्वातंत्र्याची हमी देते. यामध्ये व्यक्तीला स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. धर्माची मुक्तपणे कबुली देता येते. धर्माचे आचरण व प्रसार करण्याची मुभा आहे. महत्त्वाचे म्हणजे या देशातील नागरिकांना त्यांच्या पसंतीचा धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण याद्वारे श्रद्धा दुखावण्याचा परवाना देता येणार नाही, असे न्या. रवींद्र जोशी यांच्या एकल पीठाने ठणकावले आहे.
कायआहेप्रकरण…
आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी प्रभू रामांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. याचा गुन्हा नोंदवण्यात आला. नांदेड दंडाधिकारी न्यायालयात याचा खटला सुरू आहे. हा खटला रद्द करण्यास ओवैसी यांनी याचिका दाखल केली होती. न्या. जोशी यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. हिंदुस्थानात प्रभू रामाची पूजा केली जाते. प्रभू रामाबद्दल चुकीचे विधान केल्यास रामभक्तांच्या भावना दुखावल्या जातात. तेव्हा ओवैसी यांच्या विरोधातील खटला रद्द करता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
आवाजाच्यापातळीवरूनउद्देशस्पष्टहोतो
शब्दांचा सूर, आवाजाची पातळी आणि उच्चारण्याची पद्धत यावरूनच वक्त्याचा मूळ उद्देश स्पष्ट होतो, अन्यथा निरुपद्रवी वाटणारे शब्दही भावना दुखावण्याच्या बाबतीत अत्यंत घातक ठरू शकतात. वक्त्याचा खरा उद्देश श्रोत्याला कसा समजतो याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.



