OBC Morcha : आम्ही शेवटची लढाई लढतोय, आता ओबीसी..आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा धडकणार, लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा एल्गार

आंतरवली सराटीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु असतानाच आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा निघणार आहे. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून ओबीसींना मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात असून ते संपून जाण्याची भिती आहे. म्हणून लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाची हाक देण्यात आली आहे. कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्या समाजाला आरक्षण देणार नाही ही सरकारची भूमिका आहे. सरकारने तसं अनेकदा सांगितलं देखील आहे. कुणबी समाज हा ओबीसीमध्ये येतो. ज्या मराठ्यांच्या जुन्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. ती सरकारने मान्य देखील केली आहे. पण जात पडताळणीत काही नोंदी रद्द झाल्या आहेत. यावर मनोज जरांगेंचा आक्षेप आहे. त्यासाठी त्यांचं आमरण उपोषण सुरु आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड-पाटस येथील टोल नाक्यावरुन हा ओबीसी आक्रोश मोर्चा मुंबईच्या दिशेने निघणार आहे. ओबीसींच्या आझाद मैदानावरील मोर्चाला शासनाने परवानगी दिलेली नाही. “महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातींचा गाड्यांचा ताफा मुंबईकडे जाईल. मुंबईकडे जाताना डायव्हर्जन कसं असेल, वाहनं किती येतील असे प्रश्न आम्हाला पुण्याच्या एसपींनी विचारले. ती त्यांची जबाबदारी आहे. लोकशाही मार्गाने आम्ही आमचं आंदोलन मुंबईच्या दिशेने घेऊन जात आहोत” असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं.
आरक्षण संपल्यात जमा आहे
“आम्हाला परवानगी मिळो अथवा न मिळो. या शासनाने आमचं आरक्षण घालवलय. यांच्याकडून परवानगीची अपेक्षा काय करणार?. आम्ही शेवटची लढाई लढतोय. आता ओबीसी समाजबांधव रस्त्यावर उतरला नाही, तर यापुढे आंदोलन होणार नाही. आरक्षण संपल्यात जमा आहे. एसपींनी आमच्याशी चर्चा केली. कोणतही आश्वासन दिलं नाही” असं मुंबईच्या दिशेने रवाना होण्यााधी लक्ष्मण हाके यांनी सांगितलं.



