PM मोदी-पुतिन यांचा एकाच गाडीतून प्रवास; महासत्तांच्या समीकरणांना छेद देणारी भेट, वॉशिंग्टन ते बीजिंग पळापळ

शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेदरम्यान सोमवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी जागतिक शांततेचा संदेश देत जगभरातील संघर्षांवर चिंता व्यक्त केली आणि “अनंत युद्धाकडून (Endless War) युद्धाच्या अंताकडे (End of War)” वाटचाल करण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन केले.
अमेरिका-इराण संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक भू-राजकारण आणि पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही जागतिक नेत्यांमधील ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
गांधी आणि बुद्धांच्या भूमीचा एकच संदेश: शांततेचा मार्ग
बैठकीदरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन मुद्द्यावर भारताची भूमिका स्पष्ट केली.
आम्ही युक्रेनच्या मुद्द्यावर सातत्याने चर्चा करत आलो आहोत. याआधी जेव्हा आपली भेट झाली होती, तेव्हा तुम्ही मला या विषयातील सर्व पैलूंची सविस्तर माहिती दिली होती. भारताचा शांततेच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा आहे आणि तो यापुढेही राहील.
युद्धाचा प्रत्येक दिवस मानवतेला मागे ढकलणारा ठरतो, तर शांततेच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल मानवी समाजात नवी आशा निर्माण करते. आपल्याला अनंत युद्धांकडून युद्धाच्या अंताकडे जावे लागेल. मानवतेच्या कल्याणासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. सर्व प्रश्नांचा लवकरात लवकर आणि शांततापूर्ण मार्गाने निकाल लावणे हीच काळाची गरज असून हाच भारताचा संदेश आहे. गांधी आणि बुद्धांची ही भूमी जगाला एकच संदेश देते – तो म्हणजे शांततेचा मार्ग.
राष्ट्रीय हित हेच सर्वोच्च प्राधान्य
पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि रशिया या दोन्ही देशांसाठी “राष्ट्रीय हित” हेच सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अधोरेखित केले.
आर्थिक संबंधांना बळकटी: गेल्या वर्षी पुतिन यांनी केलेला भारत दौरा अत्यंत यशस्वी राहिला असून त्यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्याला नवी ताकद मिळाली आहे.
ब्रिक्स (BRICS) परिषदेचे निमंत्रण: भारतामध्ये लवकरच होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी संपूर्ण देश राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
द्विपक्षीय व्यापारात 2 टक्क्यांची वाढ: पुतिन
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत आणि रशियामधील वाढत्या आर्थिक संबंधांचे कौतुक केले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारात 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पंतप्रधान मोदींच्या व्यक्तिगत लक्ष आणि पुढाकारामुळेच भारत-रशिया संबंध अधिक मजबूत होत असल्याचे पुतिन यांनी आवर्जून सांगितले.
एकत्रित प्रवास
द्विपक्षीय बैठक पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एकाच गाडीतून ‘वर्ल्ड नोमॅड गेम्स’च्या कार्यक्रमासाठी एकत्र प्रवास केला.ज्यातून दोन्ही नेत्यांमधील मजबूत मैत्रीचे दर्शन घडले.



