मंत्री आदिती तटकरे यांच्या पीआरओचा आकस्मिक मृत्यू, ऑसिटिडीचा त्रास होऊ लागला म्हणून चालत असताना चक्कर येऊन पडला

जेवण केल्यानंतर ऑसिडिटीचा त्रास होऊ लागला म्हणून इमारतीखाली चालण्यासाठी गेला असता अचानक जमिनीवर कोसळून आशिष मेटे या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना भांडुप येथे घडली. आशिष हा मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी सोशल मीडिया पब्लिक रिलेशनचे काम करत होता.
भांडुप पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करून अधिक तपास करीत आहेत.
सोशल मीडिया पब्लिक रिलेशनचे काम करणाऱ्या आशिष मेटे याची सदर व्यवसायात दीपाली प्रभू ही पार्टनर होती. रविवारी रात्री आशिष काम आटोपल्यानंतर भांडुप येथे राहणाऱ्या दीपाली प्रभू हिच्याकडे जेवणासाठी गेला होता. जेवण केल्यानंतर ऑसिटिडीचा त्रास होऊ लागला म्हणून तो इमारतीखाली चालण्यासाठी गेला. पण चालत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. डोक्यावर पडल्याने त्याला दुखापत झाली. हा प्रकार कळताच दीपाली हिने त्याला नजीकच असलेल्या नवकार इस्पितळात नेले. त्यानंतर तेथून त्याला राजावाडी इस्पितळात नेण्यात आले. राजावाडीमध्ये डॉक्टरांनी आशिष याला मृत घोषित केले. आज त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. भांडुप पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून आशिषच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.
आशिष मेटे हा त्याच्या मूळ गावी वास्तव्यास असायचा. कामानिमित्त बऱ्याचदा मुंबईला यायचा. मरिन ड्राईव्ह येथील मित्तल कोर्ट या इमारतीत त्यांचे कार्यालय आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी तो सोशल मीडिया पब्लिक रिलेशनचे काम करत होता, असे समजते.



