धार्मिक

महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे उतरणार?..तर ते भोंगे जप्त करणार; प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा


मशि‍दीवरील भोंगे आणि त्यातून परिसरातील लोकांना होणारा त्रास यावरून विधानसभेत भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे.

राज्यात कुठल्याही प्रार्थना स्थळावर भोंगे लावण्याची परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागेल. जर नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना कारवाई करण्यात येईल. नियमांची अंमलबजावणी होतेय की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकावर निश्चित केली जाईल. जर पोलीस निरीक्षकाने याकडे दुर्लक्ष केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

 

विधानसभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठल्याही प्रार्थनास्थळावर जे भोंगे आहेत त्याची परवानगी घेतली पाहिजे, हे भोंगे रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बंद असले पाहिजेत. सकाळी ६ ते रात्री १० या काळात सकाळी ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे त्यापेक्षा जास्त नको असे काही निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्याबाबत कायद्यानुसार, जर अधिक डेसिबलने एखादा भोंगा वाजत असेल तर त्यावर कारवाईचे अधिकार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला केंद्राने दिले आहेत. पोलिसांनी पुढाकार घेऊन MPCB कळवायचं आहे, त्यानंतर त्या बोर्डाने पुढची कार्यवाही जे काही आरोपपत्र, कोर्टात खटला भरायचा अशी सध्या कायद्याची परिस्थिती आहे. ज्याप्रकारे या गोष्टीचा अवलंब व्हायला हवा तसा होत नाही हे खरे आहे अशी कबुली त्यांनी दिली.

 

तसेच यापुढे कुणालाही सरसकट भोंग्याची परवानगी देण्यात येणार नाही. जी परवानगी मिळेल ती निश्चित कालावधीसाठीच देण्यात येईल. या कालावधीनंतर पुन्हा भोंगा लावायचा असेल तर त्याची परवानगी पोलिसांकडून घेतली पाहिजे. ज्याठिकाणी ५५ डेसिबल, ४५ डेसिबल आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन होईल तिथे पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही. जे काही भोंगे असतील त्यांची जप्ती केली जाईल. याबाबत तंतोतंत पालन होतंय की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान, प्रत्येक पोलीस निरीक्षकाने त्यांच्या विभागातील प्रार्थना स्थळात जाऊन भोंग्याची परवानगी घेतलीय की नाही हे तपासलं पाहिजे. आपण सगळ्यांना मीटर दिलं आहे, त्यात आवाजाचं डेसिबल मोजता येते. ही मशीन प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे. प्रार्थना स्थळावरील डेसिबल मोजून जर आवाज जास्त असेल तर पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाला कळवणे, त्यांच्यामार्फत कारवाई करणे आणि दुसरं जे उल्लंघन करतील त्यांना पुन्हा परवानगी न देणे अशी कारवाई केली जाईल. अतिशय कठोरपणे या गोष्टीचे मॉनेटरिंग केले जाईल असंही मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले.

 

…तर पोलीस निरीक्षकावर कारवाई होणार

याबाबत सगळी कारवाई केंद्रानं ठरवल्यानुसार MPCB ला करायची आहे. त्यामुळे सध्या जे नियम आहेत त्यात बदल करणे गरजेचे आहे. जर हे नियम बदलले तर अधिक प्रभावीपणे यावर कारवाई करता येईल. यावर केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल. आम्ही जे बदल यात सूचवत आहोत ते केंद्राने करून द्यावेत. जेणेकरून त्या बदल्यांच्या अनुरूप भोंग्याबाबत अत्यंत कडक कारवाई करता येईल. यापुढे भोंग्याबाबत समस्येची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल तर त्यांनी नाही केले तर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.

 

देवयानी फरांदे यांनी काय म्हटलं?

राज्यात प्रार्थनास्थळांवर असणाऱ्या भोंग्याबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी मांडली. अजान म्हणणं हा धार्मिक भावना आहे परंतु भोंगा कुठल्याही धार्मिक भावनेशी संबंधित नाही. मशि‍दीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना कुणी आजारी असतं, वयोवृद्ध असते, कुणी रात्रपाळी करून आलेले असते या सर्वांना भोंग्यातून होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाचा त्रास होतो. १७ एप्रिल २०२२ रोजी नाशिक शहरात तत्कालीन पोलीस आयुक्त यांनी सरकारला पत्र पाठवले होते. भोंगे बंद करण्याबाबत ते पत्र होते, परंतु तेव्हाच्या उद्धव ठाकरे सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यांचे पत्र मीडियात व्हायरल झाले, त्यानंतर उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी १९ एप्रिल २०२२ रोजी उत्तर प्रदेशात भोंगे पूर्णपणे बंद करण्यात आले.

 

एखाद्या सणावेळी आपण भोंग्याची परवानगी देऊ शकतो, परंतु रोज दिवसातून ६-६ वेळा भोंग्यावरून अजान म्हटली जाते. या विषयात सरकार उत्तर प्रदेशच्या धर्तीवर हे भोंगे बंद करणार का, हायकोर्टाने यावर मार्गदर्शक सूचना दिली आहे त्यापलीकडे जाऊन हे विधिमंडळ कायदा करून भोंगे बंद करणार का, राज्यात कुठेही अशी कारवाई सुरू नाही. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत भोंगे वाजत असतील तिथल्या पोलीस निरीक्षकांवर तात्काळ कारवाई करणार का असा सवाल फरांदे यांनी विचारला होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *