राजकीय

सुरेश धस -धनंजय मुंडे यांच्या भेटीवर मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया, ‘मराठ्यांचा पाच हजार वर्षांच्या इतिहासात.’


भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली. स्वत: सुरेश धस यांनी या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या भेटीनंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

 

सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याच्या वृत्तावर आपला विश्वासच बसत नाही. परंतु हे जर खरे असेल तर मराठ्यांच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात असा विश्वासघात कोणीच केला नसणार, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तुम्ही भेटण्यासाठी गेलात. तुम्हाला त्यांच्याबद्दल कोणती एवढी माया सुटली? असा सवाल जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांना केला.

 

काय म्हणाले मनोज जरांगे

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी गेले असतील यावर विश्वास बसत नाही. ज्याने आपली माणसे मारली, त्याला हे भेटायला जात आहेत. मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला होता. परंतु त्यांच्या या विश्वासाचा तुम्ही घात केला. या ठिकाणी विश्वासघात शब्दही अपूर्ण आहे. संतोष देशमुख यांची ज्या क्रूरपणे हत्या झाली, त्यासंदर्भातील आरोपींशी संबंध असणाऱ्या व्यक्तीला भेटायला जाणे म्हणजे समाजाचा विश्वास तुम्ही संपवला आहे. धनंजय मुंडे यांच्या इतकी क्रूर पंकजाताई नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

 

…तर फडणवीस यांच्यापेक्षा धस जास्त दोषी

तुम्हाला मराठ्यांनी काय कमी केले, ज्यामुळे तुम्ही असा प्रकार केला. ज्याने संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केली. त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात आहात. त्यामुळे हे प्रकरण त्यांना दबायचा आहे. सर्व आरोपी सोडायचे आहे, असे दिसत असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले. मनोज जरांगे म्हणाले, खून करणाऱ्यापेक्षा खूनाचा कट रचणारा जसा जास्त दोषी असेल, तसेच या प्रकरणात सुरेश धस दोषी असतील. या प्रकरणातील एकही आरोपी सुटला तरी त्याची जबाबदारी सुरेश धस यांची राहणार आहे. जे देवेंद्र फडणवीस यांनी केले नाही ते सुरेश धस यांनी केले. गोड बोलून फसवणूक केली, असे मनोज जरांगे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हटले.

 

धनंजय मुंडे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली त्यामुळे भेटल्याचे सुरेश धस म्हणाले. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, ते काय कोमामध्ये होते. तसेच परिवारीक भेट म्हणतात, मग ते काय तुमचे चुलते आहे का? गोड बोलून काटा काढणे, असा हा प्रकार आहे. मराठ्यांच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात असे कोणीच केले नाही. परंतु लक्षात ठेवा, कोणी आले तरी मी हे प्रकरण दाबू देणार नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

 

तुमच्या राजकारणासाठी तुमच्या एखाद्या पदासाठी आणि स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे हिंडत आहात. इकडे तिकडे हिंडायचे असेल तर यामध्ये यायचे नाही, असेही जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांना ठणकावले. सुरेश धस यांना इकडे समाजाची वाहवा करून घ्यायला पाहिजे. समाजाच्या पाठीवर हात फिरवायला पाहिजे. परंतु त्यांना समाज आणि राजकारण पण करायचे आहे. मला वाटते त्यांनी फक्त कोणतेही एकच करावे. जर सुरेश धस धनंजय मुंडे यांना भेटले असतील तर शंभर टक्के मराठ्यांच्या काळजावर वार केला आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *