बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसेच यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
या प्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत दिवसेंदिवस मोठे खुलासे होत आहे.
वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनामाच्या मागणीने देखील जोर धरला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे.
काय म्हणाले रामदास आठवले ? Ramdas Athawale |
बीडमधील प्रकरणावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, “वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन खंडणी मागितली आहे. या प्रकरणाचे कॉल रेकॉर्डही समोर आले आहे. त्यामुळे त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडला आरोपी केले नसेल तर ते चुकीचे आहे. त्याला फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी करून थांबू नये. कराडच्या सांगण्यावरुनच इतर आरोपींनी खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करावे,” असे पुण्यात पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते.
यावेळी आठवले यांनी धनंजय मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. “अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप केला आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. बीड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे,” असेही आठवले यांनी सांगितले. तर “परभणीत कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे,” असे आठवले म्हणाले.