मार्गशिर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. यंदा 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जात आहे. दत्त जयंतीचे पुराणातही विशेष महत्त्व आहे.
महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात दत्त जयंतीचा सोहळा साजरा केला जातो. भारताभर दत्तांची अनेक मंदिरे आहेत. असं म्हणतात की दत्त परिक्रमा करणाऱ्या भक्तांना दत्तांचा आशीर्वाद लाभतो. भारतात दत्तांची 24 स्थाने आहेत तर महाराष्ट्रात 12 ठिकाणे आहेत. दोन ठिकाण आंध्र प्रदेश, सहा ठिकाणी कर्नाटक आणि चार ठिकाण गुजरात या राज्यांमध्ये आहे. श्रदत्त परिक्रमा कशी करावी, आणि ही स्थाने कोणती, जाणून घेऊयात.
दत्तागुरुंची पूजा केल्याने ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची पूजा केल्याचे फळ मिळते, अशी मान्यता आहे. भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्री मुनी आणि देवी अनुसूया यांचे पुत्र आहेत. दत्तगुरुंमध्ये त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचा समावेश आहे. अशी मान्यता आहे की, दत्त परिक्रमेमुळं पुण्याचा लाभ मिळतो. दत्तात्रेयांबरोबर त्यांचे विविध अवतार, त्यांचे शिष्य आणि दत्त सांप्रदायिक सत्पुरुष यांचे दर्शन घडते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील अशा 24 दत्तस्थानाना भेट देता येते. एकूण साधारण तीन हजार 600 किमीचा प्रवास आहे. दत्त परिक्रमेची सुरुवात श्रीशंकर महाराज समाधी मंदिरापासून केली जाते.
दत्त परिक्रमेतील प्रसिद्ध ठिकाणे
१. श्रीशंकरमहाराज समाधी मंदिर, पुणे
२. औदुंबर
३. बसवकल्याण
४. नृसिंहवाडी
५. अमरापूर
६. पैजारवाडी
७. कुडुत्री
८. माणगाव
९. बाळेकुंद्री
१०. मुरगोड
११. कुरवपूर
१२. मंथनगुडी
१३. लाडाची चिंचोळी
१४. कडगंजी
१५. माणिकनगर (हुमनाबाद)
१६. गाणगापूर
१७. अक्कलकोट
१८. लातूर
१९. माहूर
२०. कारंजा
२१. भालोद
२२. नारेश्वर
२३. तिलकवाडा
२४. गरुडेश्वर
दत्त परिक्रमेदरम्यान दत्तावतार आणि दत्त कृपांकित संतांचे दर्शन
१. श्रीपाद श्रीवल्लभ
२. श्रीनरसिंह सरस्वती स्वामी महाराज
३. श्रीस्वामी समर्थ महाराज
४. श्रीमाणिकप्रभू महाराज
५. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
६. पंत महाराज बाळेकुंद्रीकर
७. चिदंबर दीक्षित स्वामी महाराज
८. दीक्षित स्वामी महाराज
९. गुळवणी महाराज
१०. चिले महाराज
११. श्रीधर स्वामी
१२. श्री सायंदेव
१३. श्री सदानंद दत्त महाराज
१४. रंगावधूत महाराज
१५. श्रीशंकर महाराज
दत्त परिक्रमेतील नद्यांचे दर्शन
श्रीदत्त परिक्रमेमध्ये आपण सर्वात जास्त काळ कृष्णा नदीच्या सान्निध्यामध्ये घालवतो. श्रीदत्तात्रेयांना पर्वतांप्रमाणेच नद्यांचेही फार आकर्षण आहे. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांचा अधिकाधिक काळ कृष्णा नदीच्या सान्निध्यात गेला आहे. कृष्णेबरोबरच भीमा आणि नर्मदा या दोन मोठय़ा नद्यांचा आपल्याला दत्त परिक्रमेदरम्यान सहवास घडतो. गाणगापूर येथे भीमा- अमरजा यांचा संगम आहे. भीमा नदी शेवटी कृष्णेला मिळते. गुजरात राज्यात आपल्याला नर्मदा नदीचे विहंगम दर्शन घडते. याचबरोबर दत्त परिक्रमेदरम्यान गोदावरी नदीचे दर्शन होते. इतर अनेक लहानमोठय़ा नद्यांचे दर्शन होते.