ताज्या बातम्या

Beed Crime News : कार्यकारी अभियंत्याकडे घबाड; उत्पन्न सव्वा, खर्च पावणेदोन कोटी तरीही उरले तीन कोटी


Beed Crime : बीड -उत्पन्न सव्वा कोटी, मालमत्ता अडीच कोटी आणि खर्च पावणेदोन कोटी रूपये एवढी उधळपट्टी करूनही तीन काेटींची अपसंपदा कमावणाऱ्या अंबाजोगाईच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात अंबाजोगाईत अपसंपदाचा गुन्हा दाखल झाला आहे.

बीडच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. अभियंत्याला मुंबईतून ताब्यात घेतले आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात आतापर्यंत एवढ्या मोठ्या रक्कमेचा पहिल्यांदाच अपसंपदाचा गुन्हा दाखल झाल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले. संजयकुमार शशिकांत कोकणे (वय ५१) व ज्योती संजयकुमार कोकणे (रा. पाखल रोड, नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत.

कोकणे हा अंबाजोगाई येथील बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता होता. सध्या तो अंधेरी, मुंबई येथे त्याच पदावर कार्यरत आहे. त्याची पत्नी ज्योती या गृहिणी आहेत. कोकणे याला २०२२ मध्ये ३० हजार रुपयांची लाच घेताना ‘एसीबी’ने रंगेहात पकडले होते. त्याची घरझडती घेतली असता त्यावेळी लाखो रुपये सापडले होते. त्यानंतर ‘एसीबी’ने परवानगी घेऊन त्याच्या मालमत्तेची चौकशी केली असता त्याच्याकडे उत्पन्न, खर्च, मालमत्ता वगळून त्याच्याकडे ३ कोटी २ लाख ६४ हजार १४१ रुपयांची अपसंपदा आढळली. हा सर्व आकडा १ सप्टेंबर २०१० ते २२ जून २०२२ या दरम्यानचा आहे. याप्रकरणी ज्योती कोकणे व संजयकुमार कोकणे यांच्याविरोधात अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक युनूस शेख करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक शंकर शिंदे, सुरेश सांगळे, हनुमंत गोरे, संतोष राठोड, स्नेहलकुमार कोरडे, भारत गारदे आदींनी केली.

 

अभियंता ताब्यात, तर पत्नीला नोटीस

अपसंपदा संदर्भात गुन्हा दाखल होताच कार्यकारी अभियंता संजय कोकणे याला मुंबईतून ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक डोळे, अंबादास पुरी, गणेश म्हेत्रे, सुदर्शन निकाळजे यांनी ही कारवाई केली. तसेच त्याची पत्नी ज्योती यांना ‘एसीबी’कडून नोटीस बजावली आहे.

पत्नी गृहिणी तरीही सव्वा कोटीची मालमत्ता
संजय कोकणे याची पत्नी ज्योती कोकणे या गृहिणी आहेत. तरीही त्यांच्या नावे तब्बल १ कोटी १२ लाख रुपयांची मालमत्ता आहे. तसेच दागिन्यांवर २० लाख रुपये, तर पर्यटन यावरही या दाम्पत्याने तब्बल पावणेपाच लाख रुपये खर्च केले आहेत.

 

अभियंता ताब्यात, पत्नीला नोटीस

२०२२ मध्ये लाच घेतल्याप्रकरणी संजयकुमार कोकणेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या मालमत्तेची उघड चौकशी केली असता ३ कोटी २ लाखांची अपसंपदा आढळली. तसेच त्यांची पत्नी गृहिणी असतानाही त्यांच्या नावे १ कोटी १२ लाखांची मालमत्ता आहे. या सर्व अनुषंगाने कायदेशीर बाबी पूर्ण करून कोकणे दाम्पत्याविरोधात अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात अपसंपदाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील कोकणे याला ताब्यात घेतले असून, त्याच्या पत्नीला नोटीस दिली आहे.

– शंकर शिंदे, उपअधीक्षक, ‘एसीबी’, बीड

बापरे एवढा पैसा, तरीही लाच
एकूण उत्पन्न – १,२६,७१,३७६
मालमत्ता – २,४४,७२,६२८
खर्च – १,८४,६२,८८९
अपसंपदा – ३,०२,६४,१४१


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *