ताज्या बातम्या

जिकडे तिकडे मृतदेहाच खच, तब्बल 909 जणांचा मृत्यू; जगातली सगळ्यात भयानक घटना


सामूहिक आत्महत्येच्या अनेक घटना आजवर जगात घडल्या आहेत. कुटुंबातील काही व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या अनेक केसेस यात आहेत; मात्र एखाद्या पंथाच्या जवळपास 900 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची जगातली एकमेव घटना अमेरिकेत जोन्सटाउन इथं घडली.

 

या घटनेनं सगळ्यांचाच थरकाप उडाला.

 

पीपल्स टेंपलचे संस्थापक जिम जोन्स यांच्या नेतृत्वाखाली 18 नोव्हेंबर 1978 रोजी शेकडो लोकांनी सामूहिक आत्महत्या केली. दक्षिण अमेरिकेत गयानामध्ये एका शहरात अनेकांनी विष पिऊन आत्महत्या केली. काहींना बंदुकीच्या धाकाखाली तसं करण्यास भाग पाडलं गेलं. त्या दिवशी जोन्सटाउन इथं 909 लोकांचा बळी गेला. त्यापैकी एक तृतीयांश संख्या लहान मुलांची होती.

 

हजारो लोकांना स्वतःच्या पंथात यायला भाग पाडणाऱ्या जिम जोन्सने पीपल्स टेम्पल या ख्रिश्चन पंथाची 1950मध्ये इंडियानापोलिस इथं स्थापना केली. तो एक उत्तम नेता होता. त्यानं वर्णद्वेषाविरुद्ध प्रचार केला. त्याच्या या धोरणानं अनेक आफ्रिकन अमेरिकन लोकांना त्याकडे आकर्षित केलं. 1965 साली त्यानं त्याचा पंथ उत्तर कॅलिफोर्नियाला हलवला. 1971मध्ये तो सॅन फ्रान्सिस्कोला गेला. 1970मध्ये त्याच्या चर्चवर आर्थिक घोटाळा, शारीरिक शोषण आणि लहान मुलांना वाईक वागणूक दिल्याचे आरोप झाले. वाढत्या टीकेला व मीडियामधल्या रोषाला प्रत्युत्तर म्हणून जोन्सनं सगळ्या पंथीयांना स्वतःबरोबर गयाना इथं येण्यासाठी सांगितलं. तिथं तो उत्तम समाज तयार करील असा विश्वास त्यानं लोकांना दिला. तीन वर्षांपूर्वी त्याच्या काही अनुयायांनी त्या छोट्याशा राष्ट्रात जाऊन जंगलाच्या भागात जोन्सटाउनचा पाया रचला होता.

 

मात्र त्यानं सांगितल्यानुसार जोन्सटाउन ही उत्तम जागा म्हणून तयार झाली नाही. तिथे गेलेल्या लोकांनी अनेक दिवस शेतात व जंगलात कामं केली. त्यांनी जोन्सवर शंका घेतल्यास त्यांना शिक्षाही देण्यात येत असे. त्यांचे पासपोर्ट्स जप्त करण्यात आले. त्यांनी घरी लिहिलेली पत्र सेन्सॉर करण्यात येत असत. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बैठकींना उपस्थित राहण्यास लोकांना भाग पाडण्यात येत असे. जोन्स हळूहळू ड्रग्जच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याची मानसिक अवस्था ढासळली होती. अमेरिकन सरकार आणि इतरांचा त्याला मारण्याचा उद्देश असल्याची त्याची खात्री पटली होती. त्याकरिता लोकांनी त्याच्यासाठी आत्महत्येचं मॉक ड्रिल करावं अशी गरज त्याला वाटत होती.

 

1978 मध्ये टेम्पलचे काही माजी सदस्य आणि तत्कालीन सदस्यांच्या नातेवाईकांनी अमेरिकन काँग्रेसचे सदस्य लियो रायन यांना जोन्सटाउनला जाऊन सेटलमेंट करण्याची विनंती केली. रायन त्यांच्यासोबत काही पक्षकार आणि निरीक्षक घेऊन 17 नोव्हेंबर 1978 रोजी जोन्सटाउनमध्ये आले. प्राथमिक भेट चांगली झाली. दुसऱ्या दिवशी निघताना जोन्सटाउनमधले काही निवासी लोक रायन यांना भेटायला आले. जोन्सटाउनमधून बाहेर पडायला मदत करण्याची विनंती त्यांनी केली. या घटनेमुळे जोन्सला धक्का बसला. तो दुःखी झाला व जोन्सच्या एका लेफ्टनंटने रायन यांच्यावर चाकूनं हल्ला केला. काँग्रेसचे सदस्य व इतर चार जणांची जोन्सच्या आदेशानुसार हत्या करण्यात आली.

 

जोन्सटाउनमध्ये आल्यावर जोन्सनं सगळ्या अनुयायांना मुख्य पॅव्हेलियनमध्ये एकत्र जमण्याचा आदेश दिला. क्रांतिकारक कृती या नावाखाली सगळ्यांना आत्महत्या करण्यास सांगण्यात आलं. सगळ्यात आधी लहानांचा बळी गेला. पालक आणि नर्सेसनी सायनाइड, फळांचा रस व सीडेटिव्हज यांचं मिश्रण सीरिंजद्वारे त्यांच्या घशात ओतलं. त्यानंतर प्रौढ व्यक्ती विष पिण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या. कोणी पळून जाऊ नये यासाठी तिथे सशस्त्र सुरक्षारक्षकांनी वेढा दिला होता.

दुसऱ्या दिवशी गयानी अधिकारी जोन्सटाउनमध्ये आले असता, त्यांना शेकडो लोक मृत्यू होऊन जमिनीवर पडलेले आढळले. अनेकांचे हात एकमेकांभोवती होते, त्याच अवस्थेत ते मेले होते. काही रहिवासी जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले. जोन्सच्या मुलांसह डझनभर लोक वाचले. कारण ते गयानाच्या दुसऱ्या भागात होते. जिम जोन्स या विक्षिप्त व्यक्तीनं समाजवादी विचारसरणीनं प्रभावित होऊन अनेकांना त्या दिशेला वळवलं; मात्र नंतर त्याच्या विचित्र वागण्यानं तो हुकूमशहा बनला व शेकडो लोकांना त्यानं आत्महत्या करण्यास भाग पाडलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *