जालन्यातून डॉ. कल्याण काळे तर धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी, काँग्रेसची चौथी यादी जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी आपली चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे. यात जालन्यातून काँग्रेसने डॉ. कल्याण काळे यांना तर धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे. याची माहिती राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन देण्यात आली.
कोण आहेत डॉ. कल्याण काळे?
डॉ. कल्याण काळे हे छ.संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. आता जालना लोकसभा मतदारसंघातून ते भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दाणवे यांना टक्कर देणार आहेत.
जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सलग ५ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे डॉ. काळेंसाठी ही लढाई सोपी नसणार आहे.
असे असले तरी डॉ. काळे यांनी उमेदवारी जाहीर व्हायच्या एक महिना आधीपासूनच आपला प्रचार सुरू केला असून ते काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
२००९ मध्ये डॉ. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी काळे यांचा अवघ्या 7 हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे यंदाही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होईल यात शंका नाही.
कोण आहेत डॉ. शोभा बच्छाव?
धुळे मतदारसंघातून काँग्रेसने यंदा माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना रणांगणात उतरवले आहे. त्या आता भाजपच्या डॉ. सुभाष भामरे यांच्याशी दोन हात करतील.
धुळे मतदारसंघ धुळे आणि नाशिक अशा दोन जिल्ह्यांमध्ये विस्तारला असून, यामध्ये धुळ्यातील 3 विधानसभा मतदारसंघ तर नाशिकमधील 3 विधानसभा मतदारसंघ येतात.
यामध्ये धुळ्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण व शिंदखेडा या तीन तर नाशिकमधील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
दरम्यान जालना मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. आता दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या समोर काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे दोन हात करणार आहेत.
दुसरीकडे धुळे लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. येथे भाजपकडून दोन वेळचे खासदार डॉ. सुभाष भामरे असतील तर त्यांना काँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव आव्हान देतील.