
बटाट्याचं सेवन केल्यानं लठ्ठपणाचा आजार होऊ शकतो, अशी भीती अनेक लोकांना असते. लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या आजारापासून मुक्तता मिळावी यासाठी काही लोक बटाट्याचं सेवन करणं थांबवतात. परंतु बटाट्यात सर्वात कमी चरबी असल्यानं ते आरोग्यासाठी हानिकारक नसतं, त्यामुळं लठ्ठपणा किंवा रक्तदाबाची समस्या जाणवत नाही. परंतु बटाटा खाण्याची पद्धत ही योग्य आणि संतुलित असायला हवी. त्यामुळं आरोग्याला कोणताही धोका होत नाही. बटाटे खाण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे?
बटाट्यात असलेल्या विविध पोषकद्रव्यांमुळे त्याचा वापर जवळपास सगळ्याच भाज्यांमध्ये केला जातो. बटाट्यात असलेल्या पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी या पोषकतत्त्वांमुळं त्याचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या आरोग्यावर होत असतो. शरीरातील पचनक्रिया बारीक ठेवण्यासाठी लागणाऱ्या स्टार्चचं प्रमाण हे उकडलेल्या बटाट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यानं ज्या लोकांना पोटांचे विकार किंवा अन्नपचनासंबंधित समस्या आहे त्या लोकांनी उकडलेले बटाटे खायला हवेत. त्याचबरोबर त्यात प्रोटिन्स आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असल्यानं त्यामुळं शरीराला आवश्यक प्रमाणात ऊर्जा मिळण्यास मदत होते.
बटाटे खाण्याची योग्य पद्धत काय आहे?
जर तुम्हाला लठ्ठपणाची समस्या असेल तर त्यासाठी थेट बटाटे खाणंच बंद करणं हे योग्य नाही. त्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे बटाट्यांना चांगल्या प्रकारे उकडून घ्या, त्याला थंड करा आणि त्यानंतर त्याचं सेवन करा. उकडलेले बटाटे खाल्ल्याने पोट भरतं आणि बराच वेळ भूक नियंत्रणात राहते, याशिवाय शरीराला अतिरिक्त कॅलरीजचीही आवश्यकता नसते.
बटाटा खाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा…
ज्या लोकांना बटाटा खाणं सर्वात जास्त आवडतं त्या लोकांनी अतिप्रमाणात किंवा प्रत्येक जेवणात बटाट्याचं सेवन करणं टाळायला हवं, एका संशोधनानुसार एका दिवसात किमान १७० ग्रॅमपेक्षा जास्त बटाटे खाऊ नये, या प्रमाणात बटाटे खाल्ल्यास तुम्हाला सर्व पोषक घटक मिळतात आणि लठ्ठपणाही वाढत नाही.