
कृषी महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा
आष्टी : आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. श्रीराम आरसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार दिन साजरा करण्यात आला. प्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलतांना प्रशासन अधिकारी डॉ डि बी राऊत म्हणाले की “पत्रकारिता हे एक शस्त्र व शास्त्र असून त्याचा पत्रकारांनी नेमका वापर केला पाहिजे. बातमी लेखनांमध्ये सत्यशोधन ही महत्वाची भूमिका असली पाहिजे. समाजाची नाडी ओळखून पत्रकारांनी समाजमन घडविण्याचे कार्य करावे. वर्तमानपत्र हा विश्वासाचा मार्ग असल्याने याचे पावित्र्य टिकवून ठेवणे गरजेचे आहे. आधुनिक काळात कितीही तंत्रज्ञानाने प्रगती केली तरी मुद्रीत वर्तमानपत्राला पर्याय नाही. पत्रकारांनी भाषा शुध्द व प्रभावी वापरावी.” असे प्रतिपादन केले.
यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ श्रीराम आरसुळ म्हणाले की “बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ या नावाने देशात पहिले वर्तमानपत्र सुरु केले. त्यांनी वर्तमानपत्रांनी आरशाची भूमिका पार पाडून समाजाचे प्रतिबिंब स्पष्टपणे दाखविले पाहिजे ही भूमिका मांडली होती. ती भूमिका पत्रकारांनी सार्थ करणे अपेक्षित आहे. वेगवेगळ्या स्थित्यंतरातून समाज वाटचाल करत असतो. अशा समाजापुढे सत्य बाबी आणून समाजाचे प्रबोधन केले पाहिजे. राष्ट्रनिर्माणात वर्तमानपत्राचा महत्वाचा वाटा असतो.” यावेळी प्राध्यापक इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. काळे पि आर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रविण जाधव यांनी केले. व आभार प्रा. मिसाळ एल एस यांनी आभार मानले.