
पलामू : राँग नंबर आला आणि त्या राँग नंबरवर बोलणाऱ्याच्या प्रेमात ३ मुलांची आई पडली, यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे वास्तवात घडलंय. या राँग नंबर व्यक्तीसोबत ही महिला थेट पळून गेली. चिंतेत आलेल्या पतीनं याची तक्रार पोलिसांत केली. त्यानंतर तपासात समोर आलं की ही महिला तिच्या प्रियकरासोबत चैन्नईमध्ये आहे. पोलिसांनी या दोघांनाही परत बोलावलं. आता पती या महिलेसोबत राहण्याच्या मनस्थितीत नाही. महिलेलाही तिच्या प्रियकरासोबतच राहायचं आहे. आश्चर्यकारक म्हणजे हा रॉंग नंबर फक्त तीन महिन्यांपूर्वी आला होता. त्यानंतर झपाट्यानं या सगळ्या घडामोडी घडल्यात. झारखंड राज्यातील पलामू जिल्ह्यातला हा प्रकार आहे. ज्या तरुणाच्या आवाजावर ही महिला फिदा झाली तो राजस्थानातला राहणारा असून चैन्नईत नोकरीला आहे.
महिलेला राँग नंबर, नंतर प्रेम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला तीन महिन्यांपूर्वी या तरुणाचा राँग नंबर लागला. त्यानंतर ही महिला या तरुणाशी बोलू लागली. त्यानंतर त्यांच्यात सातत्यानं बोलणं होऊ लागलं, त्यांची एकमेकांशी मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. या तरुणाच्या ही महिला इतक्या प्रेमात पडली की तीन मुलं आणि नवऱ्याचाही तिला विसर पडला. या तरुणासोबत लग्न करण्याचा निर्णयही तिनं घेऊन टाकला. हे सगळं सुरु असताना याची किंचितशी कल्पनाही तिच्या पतीला आणि सासरच्या मंडळींना नव्हती. जेव्हा त्यांना समजलं तेव्हा खूप उशीर झालेला होता. महिला बेपत्ता झाल्याच्या दिवशीच घरातल्यांना मोठा धक्का बसला.
महिला बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार
पत्नी अचानक बेपत्ता झाल्यानंतर चिंताक्रांत पतीनं पोलीस स्टेशनात तक्रार नोंदवली. लवकरात लवकर पत्नीला शोधण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक सहाय्य घेत महिलेचा पत्ता लावला. तेव्हा ही महिला चैन्नईत असल्याचं उघड झालं. पोलिसांनी या महिलेशी संपर्क साधला आणि तिला पलामूत येण्यासाठी मनवलं. त्यानंतर ती नव्या पतीसह पालमूत पोहचली. त्यावेळी आपली पत्नी दुसऱ्या तरुणाच्या प्रेमात पडल्याचं पहिल्या नवऱ्याला समजलं.
वाराणसी ते चैन्नई
ही महिला पळाल्यानंतर वारामसीला पोहचली. तिथं तिचा प्रियकर तिला भेटला. त्यानंतर ते चैन्नईला निघून गेले. आता पोलिसांनी प्रयत्न केल्यानंतरही पत्नी पहिल्या नवऱ्यासोबत राहण्यास तयार नाहीये. एका राँग नंबरनं एका चांगल्या परिवारात फूट पाडलीय. आता या प्रकाराची चर्चा गावात सगळीकडं होतेय.