
बीड : राज्यात बऱ्याच ठिकाणी अपघाताचे सत्र सुरु आहेच. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई-लातूर महामार्गावर कार आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे.
भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पोखरी फाटा इथं आणखी एक अपघात झाला आहे. यामध्ये 5 जण जखमी झाले आहेत.
काय घडले नेमके?
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई-लातूर महामार्गावर अपघाताचे (accident) सत्र सुरूच आहे. या ठिकाणी रात्री झालेल्या दोन अपघातात तिघांचा मृत्यू आणि पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पहिल्या अपघातात (accident) बर्दापूरजवळ रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरवर भरधाव कार आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा पूर्णपणे चुराडा झाला असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. बबन प्रभू राठोड, नंदू माणिक राठोड आणि राहुल सुधाकर मुंडे अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
तर एक तासाच्या फरकाने त्याच महामार्गावर आणखी एक अपघात (accident) घडला. यामध्ये पोखरी फाटा येथे टेम्पो, कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.