गांभीर्य हवा प्रदूषणाचे… भाग ४ हवा प्रदूषणाचे स्रोत, प्रमुख प्रदूषके, परिणाम आणि उपाय

गांभीर्य हवा प्रदूषणाचे..
हवा प्रदूषणाचे स्रोत, प्रमुख प्रदूषके, परिणाम आणि उपाय
वाढती लोकसंख्या, वेगाने वाढणारे औद्योगीकरण, दळणवळणाच्या विविध साधनांमध्ये होत असलेली वाढ, मानवी विकासासाठी होत असलेला जंगलांचा ऱ्हास, खोदकाम किंवा अणुचाचणी सारख्या घातक स्फोटकांचा वापर हे प्रमुख हवा प्रदूषणाचे स्रोत मानले जातात. लोकसंख्या वाढीमुळे लोकांच्या गरजा वाढतात, त्याचबरोबर त्यांची उर्जा गरजा वाढतात. ऊर्जा निर्मितीसाठी लाकूड, कोळसा, भूगर्भ तेल यासारख्या अनेक प्रकारच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अनियंत्रित वापर होत राहतो. त्यामुळे, ऊर्जा गरज भागविताना वेगवेगळ्या प्रकारे ज्वलनशील पदार्थ वापरले जातात, त्यातूनच हवा प्रदूषण जन्म घेते व अनेक विषारी घटक हवेत मिसळतात.
वाढत्या औद्योगीकरणामुळे मानवी विकास साधला जातो, हे खरे असले तरी औद्योगीकरणासाठी ऊर्जेची गरज भागविण्यासाठी प्रचंड प्रमाणात कोळसा, अणुउर्जा किंवा अन्य प्रकारचे ऊर्जा स्रोत वापरले जातात. ज्वलनशील इंधनाच्या ज्वलनातून जीवनातून प्रचंड प्रमाणात धूर, धूळ व इतर प्रदूषित घटक हवेत मिसळतात. कोळसा आधारित वीज निर्मिती प्रकल्प असलेल्या काही शहरांमध्ये तर राखेचे सूक्ष्म कण, धूळ, धूर, यांच्यामुळे प्रदूषणाची तीव्रता इतकी वाढते की, श्वास घेणे सुद्धा अवघड होते.
शहरी भागात दळणवळणाची साधने ही हवा प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक मानले जातात. जसजशी लोकसंख्या वाढत आहे आणि विकास करण्यासाठी यंत्रांचा व तंत्रज्ञानाचा वापर अधिक होत आहे, तसतसे दळणवळणाच्या साधनांमध्ये वाढ करणे क्रमप्राप्त होत आहे. या साधनांना चलित-कार्यरत करण्यासाठी विविध प्रकारचे इंधन लागते. बस, मालवाहू ट्रक, रिक्षा, मोटारगाड्या, स्कूटर, विमान यासारख्या इंधनचलित कोणत्याही दळणवळणाच्या साधनाला चालविण्यासाठी जी ऊर्जा लागते, ती ऊर्जा विविध प्रदूषणकारी इंधन स्रोतांमधून येते. या इंधन ज्वलनाच्या वेळी प्रचंड प्रमाणात धूर, काजळी, अर्धज्वलित सूक्ष्म कण अशी विविध प्रदूषके हवेमध्ये मिसळतात आणि वातावरणात पसरून हवेचे प्रदूषण निर्माण करतात.
प्रदूषण नियंत्रणासाठी नैसर्गिक व्यवस्थेचा केल्यास, हरित पट्टे किंवा जंगल जर अधिक असेल तर अशा प्रकारच्या प्रदूषकांचा फारसा परिणाम होत नाही, कारण ती वातावरणात कमी पसरतात आणि हळूहळू ही प्रदूषके वनस्पतीद्वारे शोषून घेतली जातात, स्थिर केले जातात. परंतु, वेगाने होणारी जंगल तोड, हे एक हवा प्रदूषण वाढण्याचे प्रमुख कारण बनले आहे. वातावरणात अविरतपणे प्रदूषके सोडली जातात, आणि त्यांची शोषकयंत्रणा असलेली जंगल संपत्ती नष्ट झाल्यावर ते अधिक दीर्घकाळ वातावरणात टिकून राहू लागतात. काही शहरात जलाशये असल्यामुळे काही प्रमाणात आर्द्रता वाढून व जलपृष्ठाद्वारे शोधण झाल्यानेप्रदूषणाची तीव्रता घटते. अन्यथा, प्रदूषकांचा वातावरणातील फैलाव ही एक मोठी व गंभीर समस्या आहे.
विकास कामासाठी अनेक वेळा वेगवेगळ्या स्फोटकांचा देखील सर्रास वापर होतो, अगदी अणूचाचणी सुद्धा त्याला अपवाद नाही. अणूचाचणी किंवा तत्सम विविध खोद्कामांमधून व इमारती, पूल इत्यादी बांधकामे पाडण्याच्या कामातून होणाऱ्या स्फोटकांच्या वापरातून, औद्योगिक धुराड्यातून प्रचंड प्रमाणात धूळ, धूर आणि धातूंचे घातक कण व वाफ झालेले विविध रसायनांचे सूक्ष्मकण हवेमध्ये मिसळतात. त्यामुळे प्रचंड प्रमाणात हवा प्रदूषण होत राहते. अशाप्रकारे प्रदूषित झालेल्या हवेमध्ये जे प्रमुख वायू प्रदूषके आढळतात, त्यामध्ये अर्धज्वलित इंधनकण, डांबराचे कण किंवा काजळी, धूर, धूळ यासारखे अतिसुक्ष्म कण याबरोबरच कर्ब एकप्रणील (कार्बन मोनॉक्साईड), कर्ब द्विप्रणिले (कार्बन डाय ऑक्साईड्स), नत्र प्रणिले (नायट्रोजनचे ऑक्साईड्स), गंधक प्रणिले (सल्फरचे ऑक्साइड), क्लोरीन, फ्लोरिन, ब्रोमीन आणि आयोडीन सारखे हॅलोजन किंवा संप्लवीत सेंद्रिय संयुगे यासारखे उष्मा शोषक व विषारी वायूही असू शकतात. शिसे, जस्त, लोह, पारा, क्रोमीयम यासारख्या धातूचे कण हे सुद्धा या हवा प्रदूषकांमध्ये समाविष्ट असतात.
औद्योगिक कारखान्यांमधून जी हवा प्रदूषके बाहेर पडतात, त्यामध्ये बेंझीन, इथर, ऍसिटिक ऍसिड, सायनाईड इत्यादींची संयुगे यांचाही समावेश असतो. कृषी व्यवस्थापन व उत्पादित स्त्रोतांमधून मिसळणाऱ्या हवा प्रदूषकांमध्ये कीटकनाशक, तृणनाशक किंवा बुरशीनाशकांचे कण आणि रासायनिक खताचे कण यांचा समावेश होतो. हवेमध्ये ही प्रदूषके मिसळल्यानंतर त्यांच्या रासायनिक अभिक्रिया होऊन फोटो केमिकल स्मोग पद्धतीचे धुके-प्रदूषक निर्माण होते, ज्यामध्ये प्राणवायू त्रिप्रणील (ओझोन), नत्रप्रणिले (नायट्रोजनचे ऑक्साइड्स) अल्डेहाइड्स, इथलीन, प्रकाशरासायनिक धुके (फोटो केमिकल स्मोग), पेरॉक्सिक ऍसिटिक नायट्रेट आणि सल्फरची नत्रप्रणिले (नायट्रस व सल्फर ऑक्साईडस) इत्यादी आढळतात. अणुचाचण्या किंवा तत्सम किरणोत्सारी पदार्थाच्या स्फोटकातून किंवा वापरातून किरणोत्सारी पदार्थांचे घटक म्हणजेच लहान कण आणि घातक किरणे बाहेर पडतात व प्रदूषण करतात.
प्रा.डॉ.बी.एल.चव्हाण, (मो. ९८८१४२४५८६) पर्यावरणतज्ञ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.