
गांभीर्य हवा प्रदूषणाचे…. भाग -2
जगामध्ये दरवर्षी 90 लाख लोक प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात असा निष्कर्ष २०१९ मध्ये लान्सेट मधून प्रकाशित झाला होता. त्यामुळे, हवा प्रदूषण ही गंभीर समस्या आहे हे स्पष्ट आहे. दिल्लीतील हवा प्रदूषणाने आज (डिसेंबर २०२२) धोक्याची पातळी गाठली आहे. हवा प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वातावरणाची दृश्यमानता अवघ्या ५० मीटर पर्यंत पोचली आहे. दिवाळीच्या काळात तर दिल्लीमध्ये वायु प्रदूषणाने याहून अधिक धोकादायक पातळी गाठली होती. शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (एयर क्वालिटी इंडेक्स) म्हणजे हवेचा दर्जा स्पष्ट करणारा निर्देशांक तब्बल 400 वर पोहोचला होता ही सर्वात धोकादायक प्रदूषण पातळी मानली जाते. दिल्लीमध्ये हवा प्रदूषण इतके वाढले आहे की शहराच्या अनेक भागातील दृश्यमानता (visibility) आजही अवघ्या ५० मीटर इतकीच दिसून येते. त्यामुळे, नागरिकांनी काय काळजी घ्यावी हा एक प्रश्न आहे. अशी गंभीर स्थिती महाराष्ट्रात, मुंबईसह इतर मोठ्या शहरात उद्भवू नये यासाठी राज्य सरकारने याबाबतीत तातडीने पाऊले उचलणे आवश्यक आहेत.
दिल्लीमध्ये हिवाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात हवा प्रदूषण झाल्याने धुके निर्माण होऊन ते सर्वत्र पसरते. या धुक्यामुळे सकाळ झाली तरी वातावरण धूसर किंवा अंधुक होते, आणि दृश्य मानता कमलीची कमी होते. दाट धूके तयार झाल्यामुळे दृश्यमानता घटून वाहनांचे अनेक अपघात होत असतात. भारतातील जवळ जवळ सर्वच शहरांमध्ये वाहतुकीच्या साधनांची संख्या, विशेषता पेट्रोल व डीझेल इंधनावरील वाहनांची संख्या वाढत आहे. त्यातच, प्रामुख्याने पंजाब व हरियाणा मधील आणि इतर राज्यातील शेतकरी सुद्धा शेतातील सेंद्रिय केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सोपा मार्ग म्हणून पालापाचोळा सर्रास जाळतात. त्यापासून निर्माण होणाऱ्या हवा प्रदूषणाचा सामना देखील सर्वच लोकांना करावा लागतो. याचे गांभीर्य लक्षात घेण्यासाठी दि लान्सेट कमिशन ऑफ पॉल्युशन अँड हेल्थ यांनी २०१९ मध्ये दिलेला अहवाल महत्वाचा आहे. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये जगभरात 90 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. म्हणजे, जगातील लोकसंख्येच्या संख्येचा विचार केला, तर जवळजवळ दर सहा मृत व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू हवाप्रदूषणामुळे झाला होता, असे म्हणावे लागेल! हे प्रमाण अत्यंत भयावह आहे. विषारी वायू गळती झाली नाही तर हवा प्रदूषणामुळे तडकाफडकी मृत्यू नसल्याने दुर्लक्ष होते, पण वायू प्रदूषणामुळे शारीरिक विकार वाढून होणारे मृत्यू लक्षात घेतलेच पाहिजे. कारण, 2019 मध्ये भारतात प्रदूषणामुळे 23 लाख 50 हजार लोक मरण पावल्याचे वृत्तही प्रकाशित झाले होते. यापैकी सुमारे 16 लाख 70 हजार लोकांचा मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे झाला होता, असे नमूद करण्यात आले होते. जगाच्या तुलनेत विचार केला तर हे प्रमाण खूप आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारतातील ह्या आकडेवारी मध्ये सुमारे सहा लाख दहा हजार मृत्यू हे घरगुती प्रदूषणामुळे झाले आहेत झाले होते, असे नमूद आहे. आधुनिक काळात प्रदूषण नियंत्रण ही संकल्पनाच दुर्लक्षित होते आहे. हवेतील विषारी वायू आणि विषारी रसायनांचे कण उत्सर्जित होऊन झालेले प्रदूषण हे अकाली मृत्यूचे कारण बनत आहेत. हवा प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सहजासहजी लक्षात घेतले जात नाहीत. त्यामुळे लोक संथपणे या परिणामामुळे होरपळून निघत आहेत.
प्रा.डॉ.बी.एल.चव्हाण, (मो. ९८८१४२४५८६) पर्यावरणतज्ञ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.