
हवामान बदलाचे धोके लक्षात आल्यावर त्या दृष्टीनं शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केलं. हवामान बदलाचे जीवसृष्टीवर काय परिणाम होऊ शकतात, याबाबत आता अनेक अभ्यास होत आहेत.
हवामान बदलामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होऊ शकतात, असा अंदाज आता शास्त्रज्ञांनी वर्तवलाय. तापमानवाढीमुळे नर प्राणीही मादीमध्ये रुपांतरित होतायत. साप, पाल, सरडे या प्रजातींमध्ये अशा प्रकारचा बदल शास्त्रज्ञांना दिसून आला आहे. काही काळापूर्वी ऑस्ट्रेलियन बियर्डेड ड्रॅगन या सरड्याच्या एका प्रजातीमध्ये नरांची संख्या कमी व मादींची संख्या झपाट्यानं वाढलेली आढळून आली.
त्यांचा अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञांना असं लक्षात आलं, की क्रोमोझोम व्यतिरिक्त तापमानानुसारही त्यांचं लिंग ठरतं. गर्भ तयार होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच हे होतं. याला टेंपरेचर डिपेंडंट सेक्स डिटरमिनेशन (TSD) असं म्हणतात. यात एका ठराविक तापमानापेक्षा जास्त तापमान असेल, तर गर्भाचं लिंग बदलू शकतं.
फ्रेंच झूलॉजिस्ट मेडलिन सिमोन यांनी 1966 मध्ये पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात आणून दिली होती. मात्र त्यावेळी त्याबाबत फारसा विचार झाला नाही. 2015 नंतर मात्र त्या संदर्भात सतत अभ्यास सुरू आहे. त्यावरून काही प्राण्यांमध्ये तापमान बदल प्राण्यांचं लिंग ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, हे सिद्ध झालं.
ऑस्ट्रेलियन ड्रॅगन या प्रजातीमध्ये केवळ क्रोमोझोमवर नाही, तर तापमान जास्त असेल, तर अंडी उबवण्याच्या कालावधीतही प्राण्याचं लिंग बदलू शकतं. यामुळे नर म्हणून जन्म घेणारा सरडा मादी म्हणून जन्म घेऊ शकतो. बदलत्या काळात मादी सरड्यांध्ये तग धरून राहण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे सरड्यांच्या प्रजातीमधला हा जगण्याच्या संघर्षामुळे झालेला बदलही असू शकतो. ऑस्ट्रेलियातल्या कॅनबेरा युनिव्हर्सिटीत यावर एक अभ्यास करण्यात आला.
त्यात या प्रजातीच्या 130 सरड्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं. मादीमध्ये ZW सेक्स क्रोमोझोम असतात, तर नरामध्ये ZZ हे असतात. अंड्यांना जास्त ऊब मिळाली, तर क्रोमोझोम नर सरड्याचे असूनही अंडी उबवण्याच्या काळात ते बदलले जातात व मादीचा जन्म होतो असं दिसून आलं. यामुळे भविष्यात सरड्यांची ही प्रजाती नष्ट होऊ शकते.
तापमानवाढीचा परिणाम समुद्रातल्या कासवांवरही दिसून आला. समुद्री कासवांमध्येही क्रोमोझोम व्यतिरिक्त तापमानानुसार लिंग ठरतं. या कासवांची अंडी 27.7 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात उबवली गेली, तर त्यातून नर कासव जन्माला येतात. मात्र तापमान 31 अंशांपर्यंत पोहोचलं, तर क्रोमोझोम कोणतेही असले, तरी मादीच जन्माला येते.
ज्या ठिकाणी किनाऱ्यावरील वाळू जास्त गरम असेल, तिथे मादी कासवांची संख्या जास्त असते, असंही या अभ्यासात दिसून आलं. तापमानवाढीचा परिणाम सरपटणाऱ्या प्राण्यांवर होऊन काही प्रजातींमध्ये नर संपुष्टात येऊ शकतात. त्यामुळे कालांतरानं ही संपूर्ण प्रजात नष्ट होण्याचा धोका आहे. याचप्रमाणे तापमानवाढीचा इतर जीवांवर सूक्ष्म परिणाम होत असला, तरी भविष्यात त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात.