
जीवन विम्याच्या 1 कोटींच्या रकमेसाठी पत्नीने दोन साथीदारांसह मिळून स्वत:च्याच पतीची हत्या केली
बीड : मंचक पवार ( 37, रा.वाला, ता.रेणापूर, जि.लातूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंचक पवार हा गत काही वर्षांपासून बीड येथेच राहत होता. शनिवारी (दि.११) पिंपरगव्हाण शिवारात म्हसोबा फाट्याजवळ एका व्यक्तीचे प्रेत मिळाल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार तपास सुरु करण्यात आला. घटनास्थळी एक विना क्रमांकांची स्कुटी व पवार याच्या डोक्याला मार लागल्याचे दिसून आले. प्रथमदर्शनी हा अपघात वाटत असला तरी पोलिसांना संशय आल्याने अधिक तपास केला. हा मृतदेह मंचक गोविंद पवार याचा असल्याचे समोर आले. या प्रकरणात त्याची पत्नी व मुलाकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर पथकाने श्रीकृष्ण सखाराम बागलाने (27, रा.काकडहिरा, ता.जि.बीड) याला ताब्यात घेवून चौकशी करताच मंचक पवार याचा खून गंगाबाई मंचक पवार हीच्या सांगण्यावरुन केल्याचे समोर आले. यासाठी आणखी तिघाजणांचा यात समावेश असल्याचेही समजत आहे. यांना खुनासाठी दहा लाख रुपयांची सुपारी देखील ठरली होती. त्यापैकी दोन लाख रुपये इसार घेतला होता. या प्रकरणात पोलिसांनी श्रीकृष्ण बागलाने, सोमेश्वर वैजीनाथ गव्हाणे (47, रा.पारगाव सिरस), गंगाबाई मंचक पवार (37, रा.वाला, ता.रेणापूर, ह.मु.मिरगे रो हाऊस, अंकुशनगर बीड) यांना अटक करण्यात आली आहे.
मंचक पवार याची एक कोटी रुपयांची विमा पॉलिसी
मंचक पवार याची एक कोटी रुपयांची विमा पॉलिसी होती. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे भासवून ते एक कोटी रुपये उचलण्याचा गंगाबाईचा डाव होता. परंतु, पोलीस तपासात खून झाल्याचे समोर आल्याने आता हातात बेड्या पडल्या आहेत. यातील दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक सुनील कृष्णा लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश वाघ, संजय तुपे, कैलास ठोंबरे, नशीर शेख, अभिमन्यु औताडे, सतिश कातखडे, अशोक दुबाले, गणेश हंगे, राहुल शिंदे, अश्विन सुरवसे, गणेश मराडे, संपत तांदळे, अतुल हराळे आदिंनी केली.
कसा झाला मंचकचा खून?
शुक्रवारी श्रीकृष्णा बागलाने व इतर तिघे मंचक पवार याला घेवून म्हसोबा फाटा ते पिंपरगव्हाण रोडच्या कडेला असलेल्या शेतात दारु पित बसले होते. इतर तिघांनी त्यांच्याकडील आयशर टेम्पो दूर उभा करुन पायी त्याच्याकडे आले. यातील एकाने हातातील मोठ्या व्हील पान्याने मंचक पवार याच्या पाठीमागून डोक्यात मारले. त्यानंतर आणखी एक घाव चेहर्यावर घालण्यात आला.
खाली पडलेल्या मंचक पवार याला स्कुटीवर बसवून स्कुटी रोडपर्यंत आणण्यात आली. त्याचा अपघात झाल्याचे भासवण्यासाठी रोडच्या कडेला स्कुटी उभा केली व सोमेश्वर गव्हाणे याने उभा केलेला टेम्पो (क्र.एम.एच.12 एल.टी.3217) घेवून स्कुटीवर बसलेल्या मंचक पवार यास धडक दिल्याने मंचक पवार खाली पडून स्कुटी थोड्या अंतरावर जावून खाली पडली.
त्याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर श्रीकृष्णा बागलानेसह त्याचे सहकार तेथून निघून गेले. बागलाने हा काकडहीरा येथे घरी गेला व तेथून रेल्वे पटरीजवळ जावून अंगावरील शर्ट व पॅन्ट दोन्ही जाळून टाकले असेही तपासात समोर आले आहे.