
सिना कोळेगाव धरणाच्या दरवाजेद्वारे उन्हाळी पिकांसाठी आवर्तन सोडले
परंडा : सुरेश बागडे तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांना पाणी देण्यासाठी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन पाटबंधारे विभागाने सिना कोळेगाव धरणाच्या दरवाजेद्वारे पाणी सोडले आहे.यामुळे परंडा,भोत्रा व रोसा शिवारातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.याप्रसंगी शिवसेना युवा नेते रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते धरणाच्या दरवांजाचे पूजन करण्यात आले.
परंडा तालुक्यात मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत होते. यंदा मात्र जूनच्या सुरूवातीपासूनच तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाने पिके जोमात आली होती. अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला होता. सिना कोळेगाव, साकत, खासापुरी व चांदणी हि धरणे भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.सिना नदीवरील सिना कोळेगाव धरणाच्या ८ नंबर दरवाजेव्दारे १२०० क्यूसेक्सने उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पाणी आवर्तन सोडण्यात आले. यामुळे परंडा, भोत्रा व रोसा या गावातील ६८३ हेक्टर जमीन क्षेत्रावरील शेतकऱ्यांना यांचा फायदा होणार आहे. याप्रसंगी शिवसेना युवा नेते रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते धरणाच्या दरवांजाचे पूजन करण्यात आले. यावेळी तुषार गोफणे, अतुल गोफणे, डॉ.अमोल गोफणे, अमोल गोडगे, कार्यकारी अभियंता जगदीश जोशी, उपविभागीय अभियंता अमित शिंदे, उपविभागीय अधिकारी संजय तागडे, शाखा अभियंता शाहीद सौदागर, सहाय्यक अभियंता वेताळ गवळी, कालवा निरीक्षक सचिन होरे, गफार मुलाणी उपस्थित होते.
सिना कोळेगाव धरणाच्या मुबलक पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची पेरणी केली आहे. सध्या पिकेही जोमात आली असून, पिकांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे सिना कोळेगाव धरणातून कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे अहवाल पाठविला असता वरिष्ठांनी या अहवालाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर भोत्रा कोल्हापुरी बंधारा यात पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा उन्हाळी पिकांना फायदा होणार आहे.