देशातील बाजारात सोयाबीनचे भाव दबावात आहेत. पण प्रक्रिया प्लांट्सनी आजही सोयाबीनच्या भावात ५० रुपयांची सुधारणा केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोयाबीन, सोयापेंड आणि सायातेलाच्या दरात सुधारणा झाली.अमेरिकेत यंदाही सोयाबीन पिकाला फटका बसत आहे. अमेरिकेत बाजारा सुधरल्यास याचा फायदा भारतीय सोयाबीनलाही मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या दरात सुधारणा टिकून होती. रशिया आणि युक्रेनमध्ये निर्यातीच्या मुद्द्यावरून पुन्हा मतभेद झाल्याने सूर्यफुल तेलाचे भाव वाढले आहेत. पामतेलाने पुन्हा ४ हजार रिंगीटचा टप्पा पार केला.
कच्च्या पामतेलाचे भाव ४ हजार ५५ रिंगीट प्रतिटनांवर आहेत. त्यामुळे सोयातेलाला आधार मिळाला. सोयातेलाच्या वायद्यांमध्ये मागील चार दिवसांमध्ये ३ सेंटची वाढ झाली. सोयातेलाच्या वाद्यांनी आता ६३.०८ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा पार केला.
Soybean Market: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा
सोयाबीनचे वायदे १४.१५ डाॅलरवर पोचले होते. विशेष म्हणजेच शुक्रवारनंतर बाजारा आज उघडल्यानंतरही वायदे १४ डाॅलरपेक्षा जास्त राहीले. सोयापेंडे वायदेही ४०० डाॅलरपेक्षा वरच्या पातळीवर टिकून आहेत. सोयापेंडच्या वायद्यांनी आज दुपारपर्यंत ४१२ डाॅलर प्रतिटनांचा टप्पा गाठला होता.
देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार १०० ते ५ हजार २५० रुपयांच्या दरम्यान होते.
बाजारातील आवकही सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव दबावात दिसत आहेत. पण खाद्यतेल बाजाराला सध्या आधार मिळत आहे. सूर्यफुल तेलाचेही भाव वाढले आहेत. याचा आधार सोयाबीन दराला मिळू शकतो.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने शुक्रवारी म्हणजेच २१ जुलै रोजी प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार देशातील सोयाबीन लागवड यंदा देल्यावर्षीपेक्षा वाढली. गेल्यावर्षी देशात ११३ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. पण यंदा सोयाबीनखाली तब्बल ११४ लाख ५० हजार क्षेत्र आलं.
यंदा मध्य प्रदेशात ५१ लाख ३३ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. मध्य प्रदेशातील सोयाबीन पेरा गेल्यावर्षीपेक्षा जवळपास अडीच लाख हेक्टरने वाढला. महाराष्ट्रातही ४३ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आलं. पण महाराष्ट्रातील लागवड यंदा काहीशी कमीच दिसते. राजस्थानमध्येही लागवड ५० हजार हेक्टरने वाढून ११ लाख ४१ हजार हेक्टरवर पोचली.सध्या जागतिक बाजारात ब्राझीलचे सोयाबीन येत आहे. पण अमेरिकेतील सोयाबीन पुरवठ्याबाबत सध्या सकारात्मक चित्र नाही. पिकाला कमी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे यंदाही अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेचे सोयाबीन सप्टेंबरपासून बाजारात येते. अमेरिकेच्या सोयाबीनला चांगला दर मिळत असल्यास भारतीय सोयाबीनलाही फायदा होऊ शकतो, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.