आता त्यांचे काय होणार याचीच मला चिंता; त्यांच्यावरचा विश्वास आता उडाला- शरद पवार
पुणे : १९८० मध्येही ५६ पैकी ५० जण सोडून गेले होते. त्यांच्यापैकी ३ ते ४ सोडले तर सर्व जण नंतरच्या निवडणुकीत पराभूत झाले. मी फक्त सहा लोकांचा नेता होतो. पक्ष पुन्हा बांधला. माझा जनतेवर पूर्ण विश्वास आहे.
न्यायालयात न जाता मी लोकांमध्ये जाणार आहे. जे घडलं त्याची मला चिंता नाही. जे गेले त्यांच्या भवितव्याची चिंता आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
अजित पवारांच्या शपथेनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आम्ही न्यायालयात जाणार नाही. भांडण करणार नाही. पक्षाच्या धोरणाविरोधात काहींनी काम केले. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर मी मोठी जबाबदारी सोपविली होती. त्यांच्यावरचा माझा विश्वास उडाला आहे. त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर बँक, सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याचा उल्लेख करून पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारातील लोक आज मंत्री झाले. याचा अर्थ त्या आरोपात वास्तव नव्हते. ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांना पंतप्रधानांनी मुक्त केले. याचे श्रेय मोदी यांना आहे. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, सदाशिवराव मंडलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने ते अस्वस्थ होते, असेही ते म्हणाले. पत्रपरिषदेला आमदार रोहित पवार उपस्थित होते.
मविआबरोबरच
आपण अजूनही महाविकास आघाडीबरोबर असल्याचे सांगत पवार म्हणाले की, देशातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे फोन आले. उद्धव ठाकरे यांच्याशीही फोनवर चर्चा झाली. शपथविधी समारंभात अनेकांचे चेहरे चिंताजनक होते. पक्ष फुटला, असे मी म्हणणार नाही. अजित पवारांच्या विधानाशी सहमत असतो, तर आम्हीही त्यांच्या सोबत असतो.