भोपाळ, 27 जून : अमेरिकेतून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (27 जून) भोपाळ दौऱ्यावर आहेत. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या कार्यक्रमाअंतर्गत या दौऱ्यात पंतप्रधान रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधानांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. भ्रष्टाचार, सामाजिक विकास, घराणेशाही, महागाई यांसारख्या अनेक मुद्द्यांबाबत पंतप्रधानांनी भूमिका मांडली आणि विरोधकांवर टीकादेखील केली. भोपाळमध्ये आज (27 जून) झालेल्या रॅलीदरम्यान पंतप्रधानांनी देशाच्या विकासाबाबत त्यांचं धोरण स्पष्ट केलं. त्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी संदेश दिला.
भ्रष्टाचार, महागाई अशा काही सामाजिक मुद्द्यांबाबतही पंतप्रधानांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. भ्रष्टाचाराला नकार भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी सविस्तर भूमिका मांडली. ‘राजकीय वर्तुळात सध्या ‘गॅरंटी’ या शब्दाचा उदय झाला आहे; मात्र विरोधी पक्षांमध्ये तर भ्रष्टाचाराची गॅरंटी आहे. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांची गॅरेंटी आहे.
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षातले काही महत्त्वाचे नेते एकत्र आले होते. त्यांची पार्श्वभूमी पाहिली, तर लक्षात येईल, की त्यांनी जवळपास 20 लाख कोटी रुपयांचे घोटाळे केले असतील; मात्र देशातल्या गरीब नागरिकांना लुटणाऱ्या अशा प्रत्येक व्यक्तीवर कारवाई केली जाईल अशी गॅरंटी मी देतो,’ असं पंतप्रधान म्हणाले. सामाजिक विकास ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधांचा जल जीवन मिशनने कायापालट (9 कोटींपेक्षा अधिक नळांची जोडणी) केला आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. यामुळे सामाजिक बदलालाही हातभार लागला आहे.
मध्य प्रदेशातल्या काही गावांमध्ये अजिबातच पाणी नव्हतं. लग्न करून आपल्या मुलींना त्या गावांमध्ये लोक पाठवत नव्हते; मात्र जल जीवन मिशनमुळे ही परिस्थिती बदलली आहे, असं त्यांनी सांगितलं.
तुष्टीकरणाचं धोरण नको काही जण केवळ पक्षापुरता विचार करतात. कारण पक्षाचा भ्रष्टाचार, कमिशन यात त्यांना त्यांचा वाटा हवा असतो.
भाजप या वाटेनं चालणारा पक्ष नाही. देशाचं भलं समाधानी राहण्यात आहे, असं आम्हाला वाटतं असंही पंतप्रधान म्हणाले. आम्ही तुष्टीकरणाचं नव्हे, तर संतुष्टीकरणाचं राजकारण करतो, असं ते म्हणाले. घराणेशाहीमुळे देशाचं नुकसान राजकारणातल्या घराणेशाहीमुळे देशाचं नुकसान झालं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
गांधी, यादव, शरद पवार, अब्दुल्ला, करुणानिधी, केसीआर या सगळ्या राजकीय घराण्यांवर पंतप्रधानांनी टीका केली. त्या त्या घराण्यातल्या पुढच्या पिढीचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, तर त्या पक्षांना मत द्या; मात्र तुमच्या पुढच्या पिढीचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, तर भाजपला मत द्या असं आवाहन त्यांनी केलं.
महागाई आणि जातीयतेच्या मुद्द्यावरही पंतप्रधानांनी जनतेला संबोधित केलं. कोविड महामारी आणि युक्रेन युद्धासारख्या गंभीर परिस्थितीतही भारताने महागाई आटोक्यात ठेवल्याचं ते म्हणाले.
पाकिस्तानमध्ये महागाईचा दर 38 टक्क्यांहून जास्त आहे. श्रीलंकेमध्ये 25 टक्के महागाईचा दर आहे. बांग्लादेशात हा दर 10 टक्के आहे. भारताच्या शेजारचे देश महागाईच्या विळख्यात सापडले असताना भारतात महागाईचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे, असं मोदी यांनी सांगितलं.
भाजप कार्यकर्त्यांनी सामाजिक सेवेसाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला मोदी यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिला. समाजातल्या प्रत्येक स्तराच्या प्रयत्नांना वाट करून देण्यासाठी माध्यम म्हणून कार्यकर्त्यांनी काम करावं असंही ते म्हणाले. विकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबत जनजागृती व्हावी यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तुष्टीकरणाचं राजकारण आणि समाजात जातीच्या आधारावर फूट पाडण्याबाबत पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका केली. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, केरळ, तेलंगण, तमिळनाडूमधल्या काही जातींना या जातीय राजकारणाचा कसा फटका बसला आहे, हेही त्यांनी सांगितलं.