ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे मोठं काहीतरी घडतंय? मविआच्या गोटात हालचालींना वेग


मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरण चागलंच तापलंय. विरोधी पक्षांची पाटण्यात नुकतीच बैठक पार पडली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून ही बैठक आयोजित करण्यात आलेली.

या बैठकीला देशभरातील तब्बल 15 विरोधी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी रणनीती आखण्यात आली. विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही विरोधी पक्षांच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या गोटात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्याआधी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघावर दावा केला जातोय. त्यामुळे आगामी काळात सत्ताधारी पक्षांमध्ये काही बिनसतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये खरंच काही बिनसलं तर महाविकास आघाडीला चांगला फायदा होऊ शकतो. याशिवाय सत्ताधारी दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली तरी महाविकास आघाडीच्या पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली तरी या निवडणुकीत चांगली रंगत येण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना महाविकास आघाडीच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत.

महाविकास आघाडीची बैठक होण्याची शक्यता

महाविकास आघाडीची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीला उद्या दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीकडून अजित पवार, काँग्रेसकडून अशोक चव्हाण आणि ठाकरे गटाकडून संजय राऊत हजर राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार

दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीआधी मुंबईत आज काँग्रेसच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“आमची आज 15 ते 20 जागांवर चर्चा झाली आहे. अजून पूर्ण चर्चा झालेली नाही. पुढील मीटिंग 5 तारखेला होईल. सध्या काही जागांवर साधक-बाधक चर्चा सुरू आहे. महविकास आघाडीसोबत आम्ही चर्चा करत आहोत”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच “वज्रमूठ सभांना थोडा वेळ झाला आहे. हे आम्ही आम्ही नाकारत नाही”, असंही अशोक चव्हाण म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *