बालासोर रेल्वे अपघातानंतर ओडिशात आणखी एक मोठी दुर्घटना टळली; मालगाडी रुळावरून घसरली
रायगड, 17 जून : बालासोर रेल्वे अपघातानंतर पुन्हा एकदा मोठी दुर्घटना टळली. ओडिशातील रायगड जिल्ह्यातील अंबाडोलाजवळ शनिवारी मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले. याच्या काही दिवसांपूर्वी बालासोर येथे रेल्वे रुळावरून घसरून 291 जणांचा मृत्यू झाला होता तर 1100 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडी कालाहंडीतील अंबाडोला येथून लांजीगडमधील वेदांत प्लांटकडे जात असताना ही घटना घडली. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रेल्वे रुळावरून घसरण्याचे कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.
काही दिवसांपूर्वीच बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि लोखंडाने भरलेल्या मालगाडीचा ओडिशातील बालासोर येथील बहनगा बाजार स्टेशनवर अपघात झाला होता. बालासोरमधील मृतांची संख्या 291 वर पोहोचली दरम्यान, बिहारमधील एका प्रवाशाचा एससीबी मेडिकल कॉलेज रुग्णालयात मृत्यू झाल्याने तिहेरी रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 291 वर पोहोचली आहे. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील रोशनपूर येथील साहिल मन्सूर (वय 32) असे या प्रवाशाचे नाव आहे. हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यावर ट्रॉमा केअरच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
त्यांना किडनीशी संबंधित आजार देखील होता. जखमी व्यक्ती डायलिसिसवरही असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
13 जखमींना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले एससीबी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. सुधांशू शेखर मिश्रा म्हणाले की, हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णाचा मृत्यू झाला. त्याला विविध अंतर्गत आणि बाह्य आघात तसेच किडनीच्या समस्या होत्या. मिश्रा म्हणाले की एससीबी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या 205 रूग्णांपैकी 46 रूग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत, त्यापैकी 13 अतिदक्षता विभागात आहेत. आयसीयूमध्ये असलेल्या 13 रुग्णांपैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले.