वर्षभरापासून आरे केंद्र चालकांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा होत नसल्यामुळे केंद्र चालकांना जगणे कठीण झाले आहे. त्याची प्रशासनाने दखल घेत आरे स्टॉलवर तातडीने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र दूध वितरक सेनेच्या शिष्टमंडळाने दुग्ध व्यवसाय विकास सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दुधाचा पुरवठा बंद असल्याने आरे स्टॉलधारकांच्या उपजीविकेचे साधन असलेले आरे केंद्र चालक आर्थिकदृष्टय़ा बाधित झाले आहेत. त्यांचे उत्पन्न घटले आहे. दरम्यान, सरकारने इतर दुग्धशाळांचे दूध व दुग्धजन्य पदार्थाचे वितरण करण्यास परवानगी दिली असली तरी सर्वत्र ते उपलब्ध असल्याने आरे केंद्रावरील ग्राहक कमी झाला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आरे पेंद्रांना आरे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा सुरू करावा, महानंद दुग्धशाळा प्रशासनाने नुकत्याच दिलेल्या आरे पिशवी बंद दुधाच्या पॅकिंगबाबत दिलेल्या प्रस्तावाचा तातडीने विचार करावा, आरे केंद्र संचालकाचे वारसा हक्क व वयोमानानुसार केंद्र हस्तांतरित करीत असताना चालकाच्या मदतनीसाच्या नावावर केंद्र हस्तांतर करण्याबाबत विचार करावा आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिव गुप्ता यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन सचिवांनी दिले. यावेळी कार्याध्यक्ष राम कदम, सरचिटणीस सतीश सावंत, कोषाध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष सुहास शिवडवकर, तानाजी आरज, सचिव गीता झगडे, रवींद्र पाष्टे, राहुल साळकर आदी उपस्थित होते.