विदर्भात २५ जूनपासून जोरदार पावसाचा अंदाज; हवामान अभ्यासक पंजाब डख यांचे भाकित
डेगाव (जि.अकोला : पावसाळ्याला प्रारंभ होवून जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी उलटून सुध्दा आतापर्यंत समाधान कारक पाऊस पडला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बाब म्हणजे, हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी ता.
२५ जूनपासून विदर्भात सर्वदूर पाऊस समाधानकारक पडणार असल्याचे भाकित व्यक्त केले आहे.
वाडेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती बाळापूर तसेच पातुर यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी डॉ. वा. रा. कोरपे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येथिल कृषी उत्पन्न उपबाजार समितीमध्ये आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
हवामानाबाबत अचूक अंदाज व्यक्त करण्याची खात्या असलेल्या पंजाब डख यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांना त्यांनी दिलासा देणारी माहिती या कार्यक्रातून दिली. हवामान विषयक सखोल व सविस्तरपणे अभ्यास करून त्यांनी मांडलेले अंदाज आतापर्यंत खरे ठरत आले आहे.
यावर्षीही त्यांनी पावसाचे प्रमाण कुठल्या महिन्यात अधिक व कुठल्या महिन्यात कमी राहतील याबाबत आधीच अंदाज वर्तविले होते. भविष्यात पडणारा अवकाळी पाऊस, त्यातून होणारे शेती पिकांचे नुकसान यासह अधिकाधिक उतारा देणारे सोयाबीनचे वाण या विषयावर त्यांनी या कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली.
विदर्भातील पेरण्या पावसा अभावी रखडल्या असल्या तरी ता. २५ जूनपासून विदर्भात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला असून, पेरणी करण्यायोग्य पाऊस होणार असल्याने शेती कामांना वेग येईल, असे पंजाब डख म्हणाले.