माजी नगराध्यक्षांचे देवगड विकासकामात खोडा घालण्याचे खटाटोप सुरूच, नगरसेवक बुवा तारी यांचा आरोप
पर्यटनवाढच्या दृष्टिने देवगड बीचवर अॅनिमल पार्क करण्यात येणार आहे. मात्र हा प्रकल्प न होण्यासाठी माजी नगराध्यक्षांनी आमदारांच्या वाढदिवसासाठी त्या बीचवरच वृक्षलागवडचा संकल्प केला आहे.
अशाप्रकारे देवगड जामसंडे शहराच्या विकासकामांमध्ये कसा खोळंबा आणता येईल एवढे काम माजी नगराध्यक्ष करीत आहेत, असा घणाघाती आरोप नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी केला. नगरसेवक, लोकप्रतिनिधी फोडण्यापेक्षा आज रिक्त शिक्षकपदांमुळे शून्य शिक्षकी शाळा झाल्या आहेत, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे हे टाळण्यासाठी शिक्षक आणण्यासाठ प्रयत्न करा, असा टोलाही बुवा तारी यांनी लगावला.
उध्दव ठाकरे शिवसेना देवगड तालुका संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत बुवा तारी यांनी भाजपाचे माजी नगराध्यक्ष यांच्यावर घणाघात केला. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, न.पं.बांधकाम सभापती तेजस मामघाडी उपस्थित होते. नगर पंचायतीमार्फत देवगड बीच येथे अॅनिमल पार्क हा देवगडच्या पर्यटनवाढीच्या दृष्टिने आवश्यक असणारा महत्वाचा प्रकल्प करण्यात येणार आहे. पर्यटनवाढीसह रोजगार वाढीच्या या दृष्टिने हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. मात्र कायम देवगड जामसंडेच्या विकासात खोळंबा आणायचा, एवढेच काम भाजपाचे माजी नगराध्यक्ष करीत आहेत.
यामुळे अॅनिमल पार्क होणार त्याच ठिकाणी त्यांनी आमदारांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. मळई रस्ता, आनंदवाडी रस्ता, मळई स्मशानभूमी आदी विकासकामे सत्तेच्या बळावर रद्द करणे, पाणीप्रश्नासारख्या गंभीर प्रश्नातही खोडा घालणे, आनंदवाडी बंदर प्रकल्पाचे काम बंद पाडणे अशा विकासात्मक कामांमध्ये अडथळे आणण्याचे काम त्यांनी केले आहे. आपल्यावर भ्रष्टचाराचे आरोप केले परंतु देवगड मधील जनता सूज्ञ आहे. त्यांना चांगले माहिती आहे. न.पं. अस्तित्वात येण्यापूर्वी माझ्यावर भ्रष्टचाराचे आरोप करणाऱ्या माजी नगराध्यक्षांची आर्थिक परिस्थिती, जीवनशैली कशी होती व न.पं.मध्ये सत्ता आल्यानंतर त्यांची ही परिस्थिती कशी बदलली. बेरोजगार युवकांना त्यांची ही प्रेरणा घ्यावी लागेल असा टोलाही त्यांनी लगावला.
ज्यांची केंद्रात राज्यात सत्ता आहे, रूग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार आहेत. असे असताना ग्रामीण रूग्णालयासमोर त्यांच्याच कार्यकर्त्यांला डायलेसीस टेक्निशियनसाठी आंदोलन करावे लागते ही नामुष्की असून ग्रामीण रूग्णालयात सोयीसुविधांचा अभाव आहे, औषधांची कमतरता आहे मात्र आमदार रूग्ण कल्याण समितीच अध्यक्ष असूनही कोरोनानंतर या समितीची सभा झाली नाही हे दुर्दैवी आहे. आमदार दक्षता समितीचे अध्यक्ष असूनही रॉकेल नाही, रेशन नाही अशी स्थिती आहे मात्र सत्ताधारी असूनही याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शुन्य शिक्षकी शाळा झाल्या आहेत. नगरसेवक, लोकप्रतिनिधी फोण्यापेक्षा शिक्षक फोडा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठ प्रयत्न करा असा खोचक टोलाही बुवा तारी यांनी लगावला.