Navgan News



Add Space

आंतरराष्ट्रीयताज्या बातम्या

अमेरिकेसाठी रशियातून डिझेलचा पहिला टँकर रवाना; डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील गुप्त कराराने जगभरात खळबळ, युरोप संतापले

Spread the love

युक्रेनवरील लष्करी हल्ल्याच्या विरोधात रशियावर लादण्यात आलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय निर्बंधांना बाजूला सारत अमेरिकेने थेट रशियाकडूनडिझेल खरेदी करण्याचा धक्कादायक करार केला आहे. याकरारानुसार, रशिया गुरुवारी अमेरिकेसाठी सुमारे ४० हजार मेट्रिक टन डिझेलने भरलेला पहिला महाकाय टँकर रवाना करणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात गेल्या आठवड्यात झालेल्या थेट चर्चेनंतर या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी या घडामोडीला अधिकृत दुजोरा दिला आहे.

युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमुळे तेल शुद्धीकरण कारखान्यांचे (रिफायनरीज) मोठे नुकसान झाल्याने रशियाने ९ ऑक्टोबर रोजी डिझेलच्या निर्यातीवर तात्पुरती बंदी घातली होती. मात्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विशेष विनंतीवरून पुतिन यांनी ही बंदी उठवून अमेरिकेला डिझेल पुरवठा करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

मध्यावधी निवडणुकांसाठी ट्रम्प यांची रणनीती; पुतिन यांच्याकडे मोठी मागणी अमेरिकेत आगामी मध्यावधी निवडणुकांच्या तोंडावर इंधनाचे भाव प्रचंड वाढले आहेत. हे वाढते दर आटोक्यात आणण्यासाठी ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा करून तातडीने ३ लाख टन डिझेल पाठवण्याची विनंती केली होती. प्राथमिक पुरवठ्यानंतर अमेरिकेने रशियाकडे नोव्हेंबरपर्यंत ५ लाख टन आणि त्यानंतरच्या टप्प्यात तब्बल १० लाख टन डिझेल पुरवण्याची मागणी नोंदवली आहे. ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी बुधवारी झालेल्या चर्चेदरम्यान या इंधन पुरवठ्याबद्दल पुतिन यांचे विशेष आभार मानले.

जागतिक बाजारपेठेत डिझेलचे दर ५ ते ६ टक्क्यांनी घसरले राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी विटकॉफ यांच्याशी बोलताना स्पष्ट केले की, रशिया आणि अमेरिका यांच्यात झालेल्या या मोठ्या करारामुळे जागतिक बाजारातील अनिश्चितता दूर झाली असून जागतिक पातळीवर डिझेलच्या किमतींमध्ये ५ ते ६ टक्क्यांची थेट घसरण नोंदवली गेली आहे.

युरोप आणि युक्रेनमध्ये तीव्र संताप; भारतही थक्क एकीकडे युरोपीय देश आणि नाटो राष्ट्रे रशियावर आर्थिक बहिष्कार घालत असताना, स्वतः अमेरिकेनेच रशियाकडून इंधन खरेदी सुरू केल्याने युक्रेन आणि युरोपीय युनियनच्या देशांनी या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यावर आक्षेप घेणाऱ्या अमेरिकेने स्वतःच्या गरजेसाठी थेट रशियाशी हातमिळवणी केल्याने भारतासह जागतिक मुत्सद्दी वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भू-राजकीय समिकरणात बदल: आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, हा करार म्हणजे अमेरिका-रशिया यांच्यातील वाढती जवळीक आणि युक्रेनपासून अमेरिकेने अंतर राखण्यास सुरुवात केल्याचे उघड संकेत आहेत. याच धोरणाचा भाग म्हणून अमेरिकेने अलीकडेच युक्रेनला दिली जाणारी लष्करी मदतही कमी केली आहे.