CRIME : लबाड बोलून लग्न उरकलं! सासू वरच्या खोलीत गेली अन्… मृत्यूच्या आदल्या रात्री संजनाने 10:30 ला आईला काय सांगितलं होतं?

छत्रपती संभाजीनगरच्या हडकोतील वानखेडेनगरमध्ये 23 वर्षीय संजना नीलेश शेजवळ हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी नोकरीची थाप मारून आणि लबाड बोलून संजनाला निलेश शेजवळ या तरुणाने फसवलं अन् लग्न केलं होतं. लग्नापूर्वी नीलेशने, सरकारी अधिकारी असल्याचे सांगितले होते. मात्र, तो वैद्यकीय शिक्षणासाठी मुलांना परदेशात पाठवणाऱ्या कन्सल्टन्सी संस्थेत काम करतो, असा आरोप विवाहितेच्या नातेवाइकांनी केला.
साडेदहाच्या सुमारास संजनाचे आईला फोन केला अन्…
मृत्यूच्या आदल्या रात्री म्हणजेच 12 ऑक्टोबर रात्री साडेदहाच्या सुमारास संजनाचे आईला फोन केला होता. छोट्या छोट्या गोष्टीवरून घरातील सदस्य टोमणे मारत असल्याचं तिने आईला सांगितलं होतं, असं तिच्या वडिलांनी सांगितलं. त्यावेळी वडिलांनी तिला धीर दिला आणि शांत झोप असं सांगितलं. आम्ही सकाळी येतो, असं देखील तिच्या वडिलांनी सांगितलं होतं.
सासू ओरडत खाली आली
मंगळवारी म्हणजेच 13 ऑक्टोबर सकाळी ती वरच्या मजल्यावरील खोलीत होती. काही वेळाने तिची सासू ओरडत खाली आली आणि तिने पती नीलेशला घटनेची माहिती दिली. सासरच्या मंडळींनी संजनाला तातडीने रुग्णालयात नेलं. परंतू तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तिला एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतू, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ
दरम्यान, संजनाच्या वडिलांना पतीने शासकीय नोकरीबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचा, तसेच सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. याशिवाय, मुलीच्या मृत्यूमागे घातपात असल्याचाही संशय माहेरच्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण आणि आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.



