Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्तम वातावरण; फडणवीस यांचे यूकेच्या उद्योजकांना आवाहन

मुंबई: कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रांतील उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी असलेल्या परिसंस्थेच्या निर्मितीत महाराष्ट्र सर्वांत आघाडीवर आहे, या शब्दांत महाराष्ट्राचे महत्त्व अधोरेखित करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनायटेड किंगडममधील संस्था आणि उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, युनायटेड किंगडमचे व्यवसाय, नवोन्मेष, विज्ञान आणि व्यापार राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स उपस्थित होते.

यूकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चांनंतर विविध महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यासाठी महाराष्ट्र आणि यूकेदरम्यान झालेल्या सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला जाणार असल्याचे सांगितले.

जागतिक विद्यापीठे येणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यभरातील कुशल मनुष्यबळ, सक्षम औद्योगिक समूह आणि जागतिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या अनुभवी भागीदारांचे मजबूत जाळे ही महाराष्ट्राची ताकद आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात कॅम्पस सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे.

‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल’, ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डिन’ यांसारखी जागतिक विद्यापीठे महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्र-यूके भागीदारीमुळे महाराष्ट्रातील स्थानिक उत्पादक, अन्नप्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या आणि लघुउद्योजकांना ब्रिटनमध्ये नव्या बाजारपेठा व ग्राहक मिळविण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *