Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

ज्ञानेश कुमार आणि अमित शाह यांना हटवा, आर्मीची मदत घ्या; संजय राऊत यांची थेट राष्ट्रपतींकडे मागणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात त्यांच्याच दोन सहकाऱ्यांनी मनमानी करत असल्याचा आरोप केला आहे. ज्ञानेश कुमार यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. ते बेईमानी करत आहेत.

त्यामुळे ज्ञानेश कुमार यांना पदावरून बरखास्त केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जमत नसेल तर राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. ज्ञानेश कुमार ज्यांच्या इशाऱ्यावरून हे करत आहेत, ते केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शाह यांनाही मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ज्ञानेश कुमार आणि अमित शाह यांची हकालपट्टी नाही केली तर जनआंदोलनाचा भडका उडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांना गेल्या 10 महिन्यात 14 वेळा इतर निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी आक्षेप घेतला आहे. तसं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. त्यावर मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी ही मागणी केली. निवडणूक आयोग तीन लोकांचा बनलेला असतो. पण ज्ञानेश कुमार यांची मनमानी सुरू आहे. सुखबीर संधू आणि विवेक जोशी या दोन निवडणूक आयुक्तांनी 10 महिन्यात 14 वेळा हरकती घेतल्या आहेत. ज्ञानेश कुमार मनमानीपणे काम करत आहे. बेईमानी करत आहे. कॅबिनेट सेक्रेटरीपर्यंत त्यांच्या तक्रारी गेल्या आहेत. हे लोकशाहीसाठी घातक आहे, असं संजय राऊत म्हणाले.

बरखास्त करून खटला भरा

अमित शाह यांच्या अधिपत्याखाली निवडणूक आयोग येतो. याचा अर्थ ज्ञानेश कुमार हे अमित शाह यांच्या सूचनेनुसार आणि दबावाखाली संगनमताने गुन्हेगारी स्वरुपाचं कृत्य करत होते. या प्रकरणात अमित शाह पहिल्या क्रमांकाचे गुन्हेगार आहेत. त्यांना फूड पॉइजन झालंय. ते बेपत्ता आहेत. मोदींना लोकशाहीची थोडी चाड असेल तर त्यांनी अमित शाहा यांना मंत्रिमंडळातून बरखास्त केलं पाहिजे. निवडणूक आयोगाशी आणि संविधानाशी एवढा मोठा खेळ 80 वर्षात कोणी केला नाही. ज्ञानेश कुमार यांना बरखास्त करा आणि त्यांच्यावर खटला भरा. कुणाच्या आदेशाने त्यांनी हे केलं याची त्यांच्याकडून कबुली घेतली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

आर्मीची मदत घ्या

एक गोष्ट स्पष्ट झाली. पश्चिम बंगाल आणि बिहारच्या निवडणुका या एसआयआरच्या माध्यमातून बेईमानी पद्धतीने अमित शाहांनी ज्ञानेश कुमार यांना सोबत घेऊन जिंकल्या आहेत. आम्ही जे बोलत होतो, ते निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे. ज्ञानेश कुमार भ्रष्ट आणि बेईमाान माणूस आहे. अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांनी देशाचं वाटोळं केलं आहे. मोदी हतबल असतील, ज्ञानेश कुमार यांना रोखू शकत नसतील तर देशाच्या राष्ट्रपतींनी हस्तक्षेप केला पाहिजे. देशात असं संकट येत असेल तर अधिकाराचा वापर करून ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. आर्मीची मदत घ्यावी लागली तर घ्यावा, असंही त्यांनी म्हटलंय.

कोर्ट मार्शल करा

राष्ट्रपतींनी देश वाचवावा. मोदी हतबल आहेत. त्यांना अमित शाह आणि ट्रम्प कंट्रोल करत आहेत. मोदींनी सर्वात आधी अमित शाहांना बरखास्त केलं पाहिजे. नाही तर जन आंदोलन तुमच्या घरापर्यंत धडकल्याशिवाय राहणार नाही. जन आंदोलन करण्याबाबत आमची सर्वांची चर्चा सुरू आहे. त्यात सीजेपीही आहे. निवडणूक आयोग भ्रष्ट आहे. ज्ञानेश कुमार देशाची बेईमानी करत आहेत. त्यांचं कोर्ट मार्शल झालं पाहिजे. कोणताही कायदा मानत नसेल तर त्यांना राष्ट्रपतींनी ताब्यात घेतलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *