‘निवडणूक आयोगाचा कारभार अदृश्य हात चालवत आहे’, काँग्रेसचा ज्ञानेश कुमार यांच्यावर हल्लाबोल

निवडणूक आयोगाकडून सरकारधार्जिणे निर्णय घेत असल्याचा आरोप विरोधकांनी सातत्याने केला आहे. विशेष सखोल मतदार पडताळणी (एसआयआर) आणि मतदान यंत्राबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या.
आता द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या एका वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपला विरोध डावलून किंवा मत विचारात न घेता निर्णय घेतले असल्याची तक्रार इतर दोन सदस्यांनी केली आहे. या वृत्तानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला असून निवडणूक आयोग अदृश्य हात चालवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
निवडणूक आयोगाचे सदस्य सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी ज्ञानेश कुमार यांची तक्रार कॅबिनेट सचिवांकडे केली आहे. गेल्या दहा महिन्यांत किमान १४ वेळा या दोन्ही निवडणूक आयुक्तांनी आयोगाच्या निर्णयप्रक्रियेबाबत वेळोवेळी आक्षेप नोंदवल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. नवीन मतदारांची नोंदणी करत असताना अर्ज क्रमांक ६ चे बदलले स्वरुप, मतदार यादीतून नावे वगळणे वा नोंदवणे, एसआयआर प्रक्रियेतील काही बाबी तसेच मतदार याद्यांचे नवी दिल्लीत होत असलेले ‘केंद्रीकरण’ अशा गंभीर मुद्द्यांवर संधू आणि जोशी यांनी प्रतिकूल मतप्रदर्शन केल्याचे नोंदींवरून आढळते.
काँग्रेसचा आरोप काय?
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसने म्हटले, ‘ज्ञानेश कुमार आपले बॉस मोदींप्रमाणेच हुकूमुशाहाप्रमाणे वागत असून त्यांनी पंतप्रधान मोदींना खूश करण्यासाठी मत चोरी करत आहेत.’ ज्ञानेश कुमार हे पंतप्रधान मोदींचे लाडके असून त्यांनी सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनाच महत्त्वाच्या निर्णयांपासून दूर ठेवले, असा आरोप काँग्रेसने केला.
काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी एक्सप्रेसच्या वृत्तावर भाष्य करताना म्हटले की, निवडणूक आयोगाचे काम अदृश्य हात चालवत आहेत. तिवारी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, ‘द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तातील बाबी वरकरणी खऱ्या मानल्या तर निवडणूक आयोगाचा कारभार अदृश्य हातांद्वारे चालवला जात असल्याचे स्पष्ट होते. जर नियमांनुसार निर्णय घेतले जात नसतील आणि बहुमत डावलून प्रक्रिया पार पाडली जात असेल तर ती पूर्णतः बेकायदेशीर नसले तरी निश्चितच मनमानी पद्धतीचे आहेत. महाभियोग प्रक्रियेचा गांभीर्याने विचार करण्यासाठी चालविण्यासाठी हे उत्तम प्रकरण आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचे काय असेल तर ती निवडणूक आयोगाची विश्वासाहर्ता ज्याला आता तडे गेले आहेत.
शिवसेनेचे (ठाकरे) नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनीही ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करताना त्यांना तुरुंगात पाठवायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.



