Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

नक्षलवाद्यांचे ‘चीन कनेक्शन’ पुन्हा एकदा उघड! बिजापूरमध्ये जमिनीत सापडली चिनी बनावटीची स्फोटके

गडचिरोली : छत्तीसगडमधील बस्तरच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा सुरक्षा दलांनी शोधून काढला असून, त्यात चिनी बनावटीचे हातगोळे आढळल्याने तपास यंत्रणांचे लक्ष या स्फोटकांच्या स्रोताकडे वळले आहे.

बिजापूर जिल्ह्यातील लंका पहाडी परिसरात शोधमोहीम सुरू असताना हा साठा आढळून आला.

जमिनीखाली लपवून ठेवलेल्या या साठ्यात एक रायफल, एक इन्सास रायफल, बंदूक, दोन ग्रेनेड फेकणारी शस्त्रे, मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि हातगोळा आढळला. याशिवाय विविध मॅगझिन आणि ग्रेनेडचे स्फोटक भागही जप्त करण्यात आले आहेत. या शस्त्रसाठ्यातील चिनी बनावटीचा हातगोळा तपासाचा प्रमुख मुद्दा ठरला आहे. हा हातगोळा नक्षलवाद्यांपर्यंत नेमका कसा पोहोचला, तो कधी जंगलात आणण्यात आला आणि त्याचा यापूर्वी कोणत्या कारवायांमध्ये वापर झाला आहे का, याचा तपास केला जात आहे. मात्र, या स्फोटकाचा स्रोत किंवा तो नक्षलवाद्यांच्या हाती नेमका कसा लागला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही.

दरभा हल्ल्यानंतरही आढळले होते चिनी हातगोळे

बस्तरमधील नक्षल हिंसाचाराच्या घटनांमध्ये चिनी बनावटीच्या शस्त्रांचा संदर्भ यापूर्वीही समोर आला आहे. २०१३ मध्ये दरभा येथील भीषण नक्षल हल्ल्यानंतरच्या तपासात चिनी बनावटीचे हातगोळे आढळले होते. त्यानंतरही नक्षलविरोधी कारवायांमध्ये अशा प्रकारचे परदेशी बनावटीचे शस्त्रसाठे जप्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बिजापूरच्या जंगलात सापडलेला चिनी बनावटीचा हातगोळा तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, जुन्या घटनांशी या साठ्याचा थेट संबंध आहे, असे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महिनाभरापासून शस्त्रसाठ्यांचा शोध

बिजापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात विविध ठिकाणी नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रसाठे शोधून काढण्यात आले आहेत. काही ठिकाणी रायफल, बंदुका, काडतुसे, स्फोटके, स्फोट घडवून आणण्यासाठी लागणारे साहित्य आणि संदेशवहनाची साधने आढळली आहेत. शेजारील सुकमा जिल्ह्यातही जंगलात जमिनीत पुरून ठेवलेले दोन लोखंडी ड्रम सुरक्षा दलांना सापडले. त्यामध्ये बंदूक, संदेशवहनाची साधने, उष्णता टिपणारे उपकरण, भ्रमणध्वनी, दुर्बिणीसदृश साधने, औषधे आणि नक्षल साहित्य आढळले.

लपविलेल्या साठ्यांचा शोध सुरूच

नक्षलवाद्यांनी पूर्वी जंगलात लपवून ठेवलेली शस्त्रे आणि स्फोटके शोधण्यासाठी सुरक्षा दलांकडून सातत्याने शोधमोहीम राबवली जात आहे. दाट जंगल आणि डोंगराळ भागामुळे ही मोहीम आव्हानात्मक ठरत आहे. गुप्त माहितीच्या आधारे संशयित ठिकाणी तपास केला जात असून, श्वान पथक आणि स्फोटक शोधक पथकाचीही मदत घेतली जात आहे.बिजापूरमधील ताज्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त झाली असली, तरी चिनी बनावटीचा हातगोळा नक्षलवाद्यांच्या हाती नेमका कुठून आला, हा प्रश्न तपासाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या साठ्याचा माग काढताना आणखी काही महत्त्वाचे धागे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *