भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

प्रॉपर्टी कार्डावरील क्षेत्र दुरुस्तीचे प्रलंबित काम करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाळवा उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक आणि मुख्यालय सहाय्यकास सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सोनाली सचिन आवटी (वय ४७, रा. आष्टा) आणि सुनील गणपती पाटील (४८, रा. कोडोली, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत.
तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेल्या जागेच्या प्रॉपर्टी कार्डवरील क्षेत्र दुरुस्तीसाठी ईश्वरपूर येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. हे काम करण्यासाठी आवटी व पाटील यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने १९ ऑगस्टला सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यावेळी सुनील पाटील याने सुरुवातीला एक लाख रुपयांची मागणी केल्याचे, तर सोनाली आवटी हिने कार्यालय प्रमुखांकडे काम सादर करून मंजूर करून घेण्यासाठी चर्चेनंतर ५० हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताना काल दुपारी १.०५ वाजता आवटी व पाटील यांना ताब्यात घेतले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर अधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीच्या उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.



