दौंडमध्ये आमदार-माजी आमदारांचे पत्नी, मुलांसह ठराव : Zp अध्यक्षही मुलासह मैदानात, अनेक दिग्गजांची कुटुंबालाच पसंती

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार प्रतिनिधी निवडीसाठी ठरावाची प्रक्रिया आज (ता. २२ सप्टेंबर) पूर्ण झाली. दौंड तालुक्यातील सर्वच सर्व सोसायट्यांचे ठराव पूर्ण झाले आहेत.
यात तालुक्यातील आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, कारखान्याचे आजी-माजी पदाधिकारी, सभापती, उपसभापती यांचेही ठराव झाले आहेत. विशेष म्हणजे या राजकीय दिग्गजांनी स्वतःसोबत, पत्नीचे, मुलांचेही ठराव मंजूर करून घेतले आहेत. म्हणजेच एकाच कुटुंबातून दोघांचे आणि तिघांचे ठराव झाले आहेत. मात्र, काही नेत्यांनी विश्वासू कार्यकर्त्यालाही संधी दिली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यासोबतच दौंड तालुक्यातही सहकारी सोसाट्यांंमधून मतदान प्रतिनिधींचे ठराव घेण्यात आले आहेत. यामध्ये दिग्गज नेत्यांनी म्हणजे आमदार, माजी आमदार, सभापती आणि उपासभापती, काखान्याचे पदाधिकारी यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाच संधी दिली आहे. त्या माध्यमातून जिल्हा बॅंकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्या किंवा कुटुंबाच्या हाती राहतील, याची दक्षता घेण्यात आल्याचे दिसून येते.
भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल हे यवत स्टेशन सोसायटीमधून, तर त्यांच्या पत्नी कांचन कुल या राहु सोसायटीमधून प्रतिनिधी म्हणून नेमले गेले आहेत. कुल यांचे कट्टर विरोधक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात हे खुटबाव सोसायटी, त्यांची पत्नी मंगला थोरात ह्या खुटबावच्या भैरवनाथ सोसायटीतून, तर त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य गणेश थोरात हे कृष्णाई सोसायटी, गलांडवाडी येथून प्रतिनिधी नेमले गेले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांचा दौंड सोसायटीतून, त्यांचे सुपुत्र मल्हार जगदाळे हे मसनेरवाडी सोसायटीमधून मतदार प्रतिनिधी म्हणून नियुक्त गेले आहेत.
भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात हे बोरीपार्धी सोसायटीतून, पत्नी मंजुषा थोरात ह्या काकासाहेब थोरात सोसायटीमधून, तर चिरंजीव अभिषेक थोरात हे सोमजाईदेवी सोसायटीने मतदार प्रतिनिधी नेमले गेले आहेत. भीमा पाटस कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर ( देऊळगाव गाडा सोसायटी), पुतणे हनुमंत बारवकर ( हनुमान सोसायटी वरवंड) प्रतिनिधीसाठी पात्र ठरले आहेत.
माजी उपसभापती उत्तम आटोळे यांचे चुलते राजेंद्र आटोळे (नंदादेवी सोसायटी), नारायण आटोळे (रावणगाव सोसायटी) विजयी झाले आहेत. पाटस येथे बिरोबावाडी सोसायटीतून भीमा पाटस कारखान्याचे संचालक अरुण भागवत, तर भागवतवाडी सोसायटीतून त्यांच्या पत्नी जयश्री अरुण भागवत प्रतिनिधी गेल्या आहेत.
उंडवडी येथील विशाल भोसले यांच्या कुटुंबामध्ये पत्नी प्रियांका भोसले या जयभवानी सोसायटीमध्ये, तर चुलते प्रकाश भोसले हे उंडवडी सोसायटीमधून प्रतिनिधी गेले आहेत. सभापती सुखदेव चोरमले यांच्या पत्नी राणी चोरमले तांबेवाडी सोसायटी, माजी आमदार रवींद्र धंगेकर (माटोबा सोसायटी नाथाचीवाडी), भाजपचे माजी तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे यांचे बंधू शरद ताकवणे (पारगाव सोसायटी) जिल्हा परिषद सदस्या गायत्री खळदकर यांचे पती डॉ. विशाल खळदकर (यशोदामाता सोसायटी नानगाव) हे निवडले गेले आहेत.
माजी सभापती अप्पासाहेब पवार (सोनवडी सोसायटी), वासुदेव काळे (शिरापूर सोसायटी), पृथ्वीराज महेश भागवत ( माळेवाडी सोसायटी), जिल्हा परिषद सदस्या अनुराधा शितोळे (नागेश्वर सोसायटी पाटस), भीमा पाटस कारखान्याचे संचालक पंढरीनाथ पासलकर (नानवीज सोसायटी), ॲड. सुधीर पाटसकर ( जिरेगाव सोसायटी) हे दिग्गज आपापल्या संस्थेमधून प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहेत.
सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही संधी
पिंपळगाव (ता. दौंड) येथील सोसायटीमध्ये आमदार राहुल कुल आणि भाजपचे नारायण जगताप यांनी शेतकरी कुटुंबातील निष्ठावंत कार्यकर्ता बजरंग काकडे याला प्रतिनिधी म्हणून संधी दिली आहे. दिग्गजांच्या पंक्तीमध्ये काकडे यांना स्थान मिळाल्याने परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



