Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

दादर कबुतरखाना पुन्हा सुरू करा; निलेशचंद्रांचा भाजपच्या लोढांना इशारा, आंदोलनाची घोषणा

दादर येथील कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीवरून मुंबईतील जैन समाज आणि प्रशासनातील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. जैन मुनी निलेशचंद्र यांनी राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे जैन समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

कबुतरखान्याचा प्रश्न सुटला नाही तर मुंबईतील पायधुनी येथील गोडिजी पार्श्वनाथ जैन मंदिराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. मुनी नीलेशचंद्र यांनी सांगितले की, त्यांनी दादरचा कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी चर्चा केली. परंतु तोडगा न निघाल्यास आंदोलन केले जाईल, यावर आम्ही ठाम आहोत, असे ते म्हणाले.

दादर (Mumbai)कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयावरून यापूर्वीही जैन समाजाकडून विरोध करण्यात आला आहे. कबुतरांना खाद्य देण्यासाठी पर्यायी ठिकाणे देण्यात आली असली तरी ही ठिकाणे दादरपासून दूर असल्याने ती मान्य नसल्याचे मुनी निलेशचंद्र यांनी म्हटले आहे.

मुंबईतील कबुतरांना खाद्य देण्याच्या प्रश्नावर आरोग्यविषयक चिंतेमुळे वाद निर्माण झाला आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असा प्रशासनाचा युक्तिवाद आहे. याच पार्श्वभूमीवर कबुतरखान्यांवरील कारवाईचा मुद्दा न्यायालयातही (Court) गेला आहे.

यापूर्वी मुंबई महापालिकेने नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी चार पर्यायी ठिकाणे निश्चित केली होती. यामध्ये वरळी जलाशय, अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोड परिसर, ऐरोली-मुलुंड जकात नाका परिसर आणि बोरिवली पश्चिमेतील गोराई मैदानाचा समावेश आहे. या ठिकाणी सकाळी ७ ते ९ या वेळेत खाद्य देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र ही पर्यायी ठिकाणे दादरपासून दूर असल्याने त्याला जैन समाजातील काही घटकांकडून विरोध करण्यात आला आहे.

मंगलप्रभात लोढा हे महाराष्ट्र सरकारमधील कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री आहेत. त्यांनी पूर्वी कबुतरखाने जपण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला होता; मात्र मुनी निलेशचंद्र यांच्या काही भूमिकांशी ते सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

आठ महिन्यांपूर्वी आझाद मैदानावरील जैन समाजाच्या आंदोलनादरम्यान कबुतरांना न्याय मिळेल, असे आश्वासन मिळाले होते; मात्र मुंबईतील कबुतरखाने अद्याप बंद असून दाणा-पाणी देण्यासही परवानगी नसल्याचे निलेशचंद्र यांचे म्हणणे आहे. या प्रश्नावर लोढांची भूमिका अपेक्षेप्रमाणे नसल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे दादर कबुतरखान्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *