आम्ही जिंकलो तर ९० फुटी हनुमानाची मूर्ती पाडू’, अमेरिकेत निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद

वाशिंग्टन: अमेरिकेत सध्या मध्यावधी निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ३ नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय-अमेरिकन समुदाय राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
विशेषतः हिंदू आणि त्यांच्या श्रद्धांबद्दल काही वादग्रस्त विधाने केली जात आहेत. एका कट्टरपंथी यूट्यूबरने ‘आम्ही सत्तेत आलो तर टेक्सासमधील ९० फूट उंच हनुमानाची मूर्ती हटवू’, अशी धमकी दिली आहे. यामुळे मोठा संताप व्यक्त होत आहे.
टेक्सासमधील शुगर लँड येथील अष्टलक्ष्मी मंदिरात ही मूर्ती आहे. ‘स्टॅच्यू ऑफ द युनियन’ असं या मूर्तीचं नाव असून ऑगस्ट २०२४ मध्ये तिची स्थापना झाली. तेव्हापासूनच ही मूर्ती वादात अडकली आहे. अमेरिकेतील ख्रिश्चन कट्टरपंथीयांचा एक गट याला ‘बिगर-ख्रिश्चन’ कृत्य म्हणत विरोध करत आहे. आता जेसी ह्युजेस या यूट्यूबर आणि ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (MAGA) कार्यकर्त्याने इन्स्टाग्रामवर या मूर्तीचा फोटो शेअर केला. त्याने लिहिलंय, “लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही जिंकू, तेव्हा आम्ही हे पाडून टाकू.” यानंतर या चर्चेला वर्णद्वेषी वळण लागलं आहे.
ह्युजेसच्या या पोस्टवर हिंदू संघटना आणि विचारवंतांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमेरिकन-हिंदू माजी सैनिक रुचिर बक्षी यांनी याला देशद्रोह आणि हिंदू धर्मावरील हल्ला म्हटलं आहे. ते म्हणाले की, “तुम्हाला त्यांच्या श्रद्धांचा तिरस्कार आहे, फक्त याच कारणासाठी दुसऱ्या अमेरिकन समुदायाच्या प्रार्थनास्थळाची तोडफोड करणं, ही हिंदू धर्माला दिलेली थेट धमकी आहे.”
हिंदू मंदिरांची तोडफोड
“अमेरिकेत जिंकणं म्हणजे जर हिंदू मंदिरं नष्ट करणं असेल, तर ज्या देशासाठी मी लढलो, तो देश तुम्हाला नकोय,” असं बक्षी यांनी ठणकावून सांगितलं. बक्षी यांच्या या भूमिकेला ‘कोलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ (CoHNA) आणि टेक्सासमधील आणखी एक माजी अमेरिकन सैनिक व राजकीय विश्लेषक कार्ल व्हॅलेस यांनीही पाठिंबा दिला आहे. CoHNA ने X वर पोस्ट करत म्हटलंय की, “या प्लॅटफॉर्मवर उघडपणे दाखवल्या जाणाऱ्या धार्मिक कट्टरतेमुळे आम्हालाही तुमच्याइतकाच धक्का बसला आहे. याविरुद्ध लढण्यात आम्हाला तुमच्यासोबत उभे राहण्याचा अभिमान वाटतो.”
टेक्सास हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला
टेक्सास हा गेल्या अनेक दशकांपासून रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. १९९४ पासून इथे कोणताही डेमोक्रॅट नेता सत्तेत आलेला नाही. या राज्यात पाच लाखांहून अधिक भारतीय-अमेरिकन नागरिक राहतात. इथे रिपब्लिकन पक्षाचं पूर्ण वर्चस्व आहे. राज्याचं गव्हर्नरपद, सर्व प्रमुख कार्यकारी पदे आणि राज्य विधिमंडळाची दोन्ही सभागृहे याच पक्षाच्या ताब्यात आहेत. टेक्सासमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान स्थलांतरितांना विरोध करणारी भाषणं नेहमीच ऐकायला मिळतात. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा व्हाईट हाऊसमध्ये परतल्यापासून यात आणखी वाढ झाली आहे.



