मसूरसाठी प्रतिक्विंटल 12 हजार रुपये, तर हरभऱ्यासाठी प्रतिक्विंटल 6 हजार रुपये अनुदान, इथे करा अर्ज

नाशिक : रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत मसूर व हरभरा पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी तसेच प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक
कंपनी (FPO) आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.
कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये मसूर व हरभरा पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे दि. ३१ मार्च २०२६ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना लाभ देण्यात येणार आहे. यासाठी गटाने प्राधिकृत केलेल्या सदस्यामार्फत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गटांची निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे.
प्रमाणित बियाणे वितरणासाठी पाच वर्षांतील वाणांमध्ये मसूरसाठी प्रतिक्विंटल १२ हजार रुपये, तर हरभऱ्यासाठी प्रतिक्विंटल ६ हजार रुपये अनुदान दर आहे. तसेच पाच वर्षांवरील परंतु दहा वर्षांतील वाणांमध्ये मसूरसाठी प्रतिक्विंटल ६ हजार रुपये आणि हरभऱ्यासाठी प्रतिक्विंटल ४ हजार रुपये अनुदान दर निश्चित करण्यात आला आहे. या घटकासाठी वैयक्तिक लाभार्थीही अर्ज करू शकतात. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना ‘प्रात्यक्षिक, बियाणे वितरण, सीड किट मिनी किट, औषधे आणि खते’ या टाईलअंतर्गत शेतकरी गटांना अर्ज करता येईल.
शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार अर्ज करणाऱ्या व लाभ घेणाऱ्या गट सदस्यांचा Farmer ID असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त शेतकरी गटांनी पिक प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.माने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.



