
सहार पोलिसांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर प्रवास करणाऱ्या दोन अफगाणिस्तानच्या नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांची ओळख शरबत अली शाह खान आणि सुजन खान अशी पटली आहे. दोघेही दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने मुंबईत आले होते. विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवर तैनात असलेले अधिकारी योगेश सुरेश यादव यांनी त्यांची कागदपत्रे तपासली. त्याचवेळी कोलकाता विमानतळ इमिग्रेशनने जारी केलेला लुकआऊट सर्क्युलर अलर्ट लक्षात आला आणि दोघांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या तपासात लक्षात आले की, शरबत अली शाह खान 10 ऑगस्ट 2016 रोजी सिंगल-एंट्री मेडिकल व्हिसावर भारतात आला होता. त्याचा व्हिसा 11 ऑक्टोबर 2016 रोजी संपला, परंतु परत जाण्याऐवजी त्याने भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केले. त्यानंतर त्याने त्याच्या नावात किरकोळ बदल करून आणि ‘जन्मस्थान पाटणा, बिहार’ असे नमूद करून बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने भारतीय पासपोर्ट मिळवला.
याच प्रकरणातील दुसरा आरोपी, सुजन खान, हा देखील ऑगस्ट 2016 मध्ये पर्यटक व्हिसावर भारतात आला होता. त्याचा व्हिसा संपल्यानंतर, तो देखील अफगाणिस्तानला परतला नाही. तोदेखील भारतात बेकायदेशीरपणे राहू लागला. त्यानेही बनावट कागदपत्रे तयार करून भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा आरोप आहे. तपासात पोलिसांना समजले की, 2016 मध्ये दोन्ही आरोपींनी मुंबईस्थित एका एजंटशी संपर्क साधला होता. त्या एजंटने त्यांच्यासाठी बनावट मतदार ओळखपत्रे, ओळखपत्रे, पॅन कार्ड आणि वाहन चालवण्याचे परवाने तयार केले. या बनावट कागदपत्रांचा वापर करून, त्यांनी खोटी नावे आणि जन्माची खोटी माहिती देऊन भारतीय पासपोर्ट मिळवले. या बनावट भारतीय पासपोर्टचा वापर करून ते 2023 मध्ये मुंबईहून दुबईलाही गेले. तिथे त्यांनी वर्क व्हिसा मिळवला आणि अनेक वर्षे भारताबाहेर वास्तव्य केले.
आता 17 सप्टेंबर रोजी दोघे दुबईहून मुंबईला परत आले, तेव्हा विमानतळावरील इमिग्रेशन तपासणीदरम्यान त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून बनावट भारतीय पासपोर्ट, बोर्डिंग पास, ओळखपत्रे, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. तपासात असेही उघड झाले आहे की, अटकेच्या भीतीने त्या दोघांनी त्यांच्या मोबाईल फोनमधील डेटा पूर्णपणे फॉरमॅट केला होता. सहार पोलीस आता त्यांच्यासाठी बनावट कागदपत्रे आणि पासपोर्ट तयार करणाऱ्या मुंबईतील एजंटचा तपास करत आहेत.



